रत्नागिरी : भाजपाचा ‘अंमलबजावणी आराखडा’

रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनाम्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून, पक्षाने त्याचे स्वरुप परंपरागत जाहीरनाम्याच्या दोन पाऊल पुढे जाऊन आता ‘अंमलबजावणी आराखडा’ करण्याचे निश्चित केले आहे. या आराखड्यासाठी मतदारांनी विविध मुद्द्यांबाबत महाराष्ट्राच्या विकासाच्या आपल्या आकांक्षा सूचनांच्या स्वरूपात पक्षाकडे पाठवाव्यात, असे आवाहन नवनिर्वाचित आमदार व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशअध्यक्षा चित्रा वाघ यांनी बुधवारी रत्नागिरी येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने केंद्रात आणि राज्यात अंमलबजावणीच्या आघाडीवर उल्लेखनीय असे यश मिळविले आहे. परंपरागत जाहीरनाम्यात केवळ आश्वासने असतात. संकल्प पत्र ही पुढची पायरी होती. आता सत्तेवर पुन्हा येण्याच्या आत्मविश्वासातून आम्ही आमच्या संकल्पांतून कशा प्रकारे अमलात आणायचा आराखडा तयार करीत आहोत, असे ही श्रीमती वाघ यांनी सांगितले.

भाजपने २०२४ च्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी ३० सदस्यांची एक जाहीरनामा समिती नियुक्त केली असून सुधीर मुनगंटीवार यांच्या व्यतिरिक्त या समितीत डॉ. विनय सहस्रबुद्धे, माधव भांडारी, उज्ज्वल निकम, डॉ. भारती पवार, सुभाष देशमुख, माधवी नाईक, दिलीप कांबळे, खा. धनंजय महाडिक, संभाजी निलंगेकर, धनंजय मंगरूळे, केशव उपाध्ये, अनिल सोले, नरेंद्र पवार इत्यादींचा समावेश आहे.

सूचना पाठविण्यासाठी पक्षाने आपल्या वेबसाईटवर एक स्वतंत्र विभाग तयार केला आहे. मतदारांनी ई-मेल अथवा पत्र पाठवून आपल्या ठोस सूचना पाठवाव्यात, असे आवाहन पक्षाने केले असल्याची माहिती आ. चित्रा वाघ यांनी यावेळी दिली पत्रकारांना दिली.

मुख्य समितीच्या अंतर्गत विविध विषयांसाठी एकूण १८ उप-समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. यात उज्ज्वल निकम (कायदा-सुव्यवस्था), माधव भांडारी (मदत आणि पुनर्वसन) पाशा पटेल (शेती आणि शेतकरी), स्मिता वाघ (महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण), दिलीप कांबळे (सामाजिक न्याय), प्रा. श्रीपाद ढेकणे (शिक्षण) आणि लद्दाराम नागवानी (ज्येष्ठ नागरिक) इत्यादींचा समावेश आहे.

राज्याच्या विविध भागातील विविध समाज घटकांच्या प्रतिनिधींबरोबर समक्ष चर्चा, ऑनलाईन पद्धतीने विचार-विमर्श बैठका आणि मान्यवरांचा सल्ला घेण्यासाठी वार्तालाप इत्यादी उपक्रम अंमलात येत आहेत.

या शिवाय स्वतंत्र फेसबुक पेज तसेच ट्विटर आणि इन्स्टाग्राम खाती आणि विशिष्ट ई-मेल आय.डी. देखील तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी आमदार बाळ माने आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 17/Oct/2024