रत्नागिरी : शहरातील पालिकेच्या निवखोल शाळेत विद्यार्थ्यांनी येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गेले दोन दिवस विद्यार्थ्यांविना शाळा सुरू आहे. शिक्षिका विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करतात, दमदाटी करतात, असा पालकांचा आक्षेप आहे. त्या शिक्षिकेला बदलल्याशिवाय मुलांना शाळेत पाठविणार नाही, असा पवित्रा पालकांनी घेतला आहे. शाळेचे शैक्षणिक कामकाज बंद असल्याच्या प्रकरणाची चौकशी पालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी एस. जे. मुरकुटे यांनी करून त्याचा अहवाल पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे; परंतु अद्याप यावर तोडगा निघालेला नाही.
निवखोल येथील पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक काही दिवसांपासून शाळेतील शिक्षिकेच्या वागणुकीबद्दल तक्रारी करत होते. पालकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित शिक्षिका काही विद्यार्थ्यांना विशेष वागणूक देते, तर इतरांशी भेदभाव करते आणि त्यांना दमदाटी करते. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुले शाळेत जाण्यास कचरत आहेत. गुरुवारपासून पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास पूर्णपणे नकार दिला आहे. पालकांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत या शिक्षिकेवर योग्य कारवाई होत नाही आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व समान वातावरणाची हमी मिळत नाही, तोपर्यंत ते मुलांना शाळेत पाठविणार नाहीत.
पालकांनी यामध्ये शिक्षण विभागाच्या आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालून चौकशी करण्याची मागणी केली. पालकांच्या तक्रारीवरून शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी मुरकुटे यांनी याप्रकरणी चौकशी केली. त्याबाबतचा अहवाल त्यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे. याप्रकरणी योग्य तो तोडगा काढू, असे मुख्याधिकाऱ्यांनी पालकांना सांगितले; परंतु शिक्षिकेची बदली केली जात नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही, असा पवित्रा पालकांनी घेतलेला आहे. याप्रकरणात पालिका यावर काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
निवखोल शाळेविषयी माझ्याकडे अहवाल आला आहे. त्यामध्ये पालकांनी मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षिकेचीही पालकांच्या विरोधात तक्रार आहे. यात मुलांचे नुकसान होऊ नये, यासाठी संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मी दिले आहेत- वैभव गारवे, मुख्याधिकारी, रत्नागिरी पालिका
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:10 PM 23/Jul/2025














