रत्नागिरी, २४ जुलै : रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर परिसरात काल रात्री चोरट्यांनी एका दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला, मात्र त्यांच्या हाती मोठी रक्कम लागण्याऐवजी फक्त चिल्लरच (सुटे पैसे) मिळाली. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले आहे का, अशी भीती व्यक्त होत आहे.
शिवाजीनगर येथील प्रवीण सुपर मार्केटमध्ये ही घटना घडली. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली होती, मात्र चलाख चोरट्यांनी जाताना सर्व फुटेज डिलीट केल्याची माहिती मिळत आहे, ज्यामुळे तपासात अडथळा निर्माण झाला आहे.
आज सकाळी दुकान मालकाच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. रत्नागिरी शहरात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण झाल्यापासून चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली होती. मात्र, या घटनेमुळे नागरिकांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांना केवळ चिल्लर मिळाली असली तरी, शहरात रात्रीच्या वेळी चोऱ्यांचे प्रमाण वाढू नये यासाठी पोलिसांनी अधिक सतर्कता बाळगण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.













