स्वाभिमानी शेतकरी संघटनेला खिंडार : २० जिल्हाध्यक्ष लवकरच शिवसेनेत! उदय सामंतांचा ‘मास्टर स्ट्रोक’

मुंबई, २४ जुलै : राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तब्बल २० जिल्हाध्यक्ष लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी या पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेतल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे. सामंत यांनी हा ‘मास्टर स्ट्रोक’ मारल्याचे बोलले जात आहे.

प्रा. जालिंदर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व जिल्हाध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करतील. प्रा. जालिंदर पाटील यांनी या २० जिल्हाध्यक्षांशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले, “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेसोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाच्या मुख्य प्रवाहात आणता येतील, तसेच विकासाच्या कामातही मदत होईल.”

उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतरच हा पक्षप्रवेश निश्चित झाल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे. लवकरच या २० जिल्हाध्यक्षांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश सोहळा पार पडेल. या पक्षप्रवेशामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठे खिंडार पडणार असून, शिवसेनेची ताकद ग्रामीण भागात वाढण्यास मदत होईल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 24-07-2025