रत्नागिरी मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये २ लाख ८९ हजार ९६४ मतदार असून, मतदान नोंदणीसाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. या मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असून, ८५ वर्षांहून अधिक वयाचे साडेआठ हजार मतदार असल्याची माहिती या निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी यांनी दिली. प्रत्येक उमेदवाराला ४० लाखांच्या खर्चाची मर्यादा असून, उमेदवारांच्या खर्चासह निवडणूक प्रक्रियेवर यंत्रणेचे विशेष लक्ष राहणार आहे.

बुधवारी दुपारी उपविभागीय कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेला सहा. निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम म्हात्रे, उपविभागीय पोलिस अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना देसाई यांनी सांगितले की, २२ ऑक्टोबर रोजी निवडणुकीबाबत नोटीफिकेशन जारी होणार आहे. रत्नागिरी मतदारसंघात १५ ऑक्टोबरपर्यंत २ लाख ८९ हजार ९६४ मतदार असून, त्यात १ लाख ४१ हजार ५५६ रुपये पुरुष, तर १ लाख ४८ हजार ३९७ महिला मतदार आहेत, तर ११ तृतीय पंथीय मतदार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या मतदारसंघात ४ हजार ४४० नवमतदार असून ते प्रथमच मतदान करणार आहेत, तर ८० वर्षांहून अधिक वयाचे ८ हजार ५१९ मतदार आहेत. सर्वाधिक मतदार हे ४० ते ४९ वयोगटातील आहेत. ८५ वर्षांहून अधिक ३७१२ मतदार असून, यात १४९५ पुरुष तर २२१७ महिला मतदार आहेत. मतदारसंघात ११८५ दिव्यांग मतदार आहेत, तर ४४ सर्व्हिस वोटर आहेत, तर १३ अनिवासी भारतीय मतदार आहेत.

रत्नागिरी मतदारसंघात ३५२ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये शहरात २९ ठिकाणी ६७ मतदान केंद्रे, तर ग्रामीण भागात २३६ ठिकाणी २८५ मतदान केंद्रे आहेत. शहरामध्ये गोदूताई जांभेकर महिला विद्यालय हे मॉडेल पोलिंग स्टेशन असणार आहे. सर्व महिला कर्मचारी असणारे मतदान केंद्र हे १८५ नंबर न.प. वॉर्ड क्रमांक ४ व ६ मध्ये असणार आहे. दिव्यांग कर्मचारी असणारे मतदान केंद्र खेडशी येथे असून, तरुण कर्मचारी असणारे केंद्र नाचणे येथे असणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मतदारसंघासाठी ३६ झोनल अधिकारी असून, ५ राखीव झोनल असे ४१ अधिकारी आहेत.

या मतदारसंघात ९ फिरती भरारी पथके आहेत. ३ व्हिडीओ भरारी पथके असून, मतदारसंघात भाट्ये, गावखडी, हातखंबा, उक्शी, करबुडे फाटा व वाटद खंडाळा याठिकाणी पथके तैनात करण्यात येणार आहेत.

प्रत्येक उमेदवाराला ४० लाख खर्च मर्यादा असून नॉमिनेशन भरल्यापासून हा खर्च मोजला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 17/Oct/2024