राजापूर, २४ जुलै ( तुषार पाचलकर ) : राजापूर तालुक्यातील तळवडे (बौद्धवाडी) येथील सचिन जाधव उर्फ बावा (वय ४४) या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह बुधवारी दुपारी अर्जुना नदीच्या काठी पुलाजवळ गौंड चिरफळीचा माळ या परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने राजापूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन जाधव हे शनिवार, १९ जुलै २०२५ पासून बेपत्ता होते, त्यांचा शोध ग्रामस्थांसह नातेवाईकांकडून सुरू होता.
सचिन जाधव यांचा थांगपत्ता लागत नसल्याने त्यांची बहीण गौतमी नंदकुमार कांबळे (रा. जुगाई, येळवण) यांनी रायपाटण पोलीस दूरक्षेत्रात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस तपास करत असतानाच आज दुपारी अर्जुना नदीच्या पुलाजवळील वडचाआई मंदिर परिसरात एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे आणि त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील घाडगे आणि रामदास पाटील यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह नदीतून बाहेर काढला. मृतदेहाच्या हातावर ‘बावा’ हे नाव कोरलेले असल्याने त्याची ओळख पटण्यास मदत झाली.
मृतदेह तब्बल तीन दिवस पाण्यात असल्याने तो पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत होता. त्यानंतर रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंदरीकर आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी येऊन मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले.
या प्रकरणाचा पुढील तपास रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे अधिकारी कमलाकर पाटील करत आहेत. सचिन जाधव यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा अपघात आहे, आत्महत्या की घातपात, याचा छडा लावण्यासाठी पोलीस कसून प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे तळवडे आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 24-07-2025














