रत्नागिरी, २४ जुलै: संगमेश्वर तालुक्यातील शिव धामापूर, भुसेवाडी येथे कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यातून एका ५८ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कमलाकर शंकर गायकर (वय ५८, रा. शिव धामापूर, भुसेवाडी, ता. संगमेश्वर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
ही घटना २२ जुलै २०२५ रोजी रात्री ८:०० ते २३ जुलै २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबतची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात २३ जुलै रोजी दुपारी ३:४५ वाजता करण्यात आली आहे (अमू. क्र. २२/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे).
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलाकर गायकर आणि त्यांच्या पत्नीमध्ये सुमारे तीन महिन्यांपूर्वी संशयाच्या कारणावरून कौटुंबिक वाद झाला होता. त्यावेळी कमलाकर यांनी पत्नीला हाताने मारहाण केली होती. तेव्हापासून कमलाकर आणि त्यांची पत्नी विभक्त राहत होते. या कौटुंबिक कलहामुळे आलेल्या नैराश्यातून कमलाकर गायकर यांनी आपल्या राहत्या घरातील हॉलमधील सीलिंग फॅनच्या हुकला नायलॉन दोरीने गळफास लावून घेतला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
‘Axphyxia due to hanging’ असे त्यांच्या मृत्यूचे कारण वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. या घटनेने शिव धामापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संगमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 24-07-2025














