रत्नागिरी : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २२ रुग्णांना १७ लाख ३० हजारांची वैद्यकीय मदत

रत्नागिरी : अचानक उद्भवलेल्या गंभीर आजार किंवा अपघात यामुळे कुटुंबाला वैद्यकीय खर्च करावे लागतात. आर्थिक अडचणीमुळे अनेकांना योग्य उपचार मिळवणे कठीण होते. गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक बळ मिळावे, यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू केला आहे. जिल्ह्यातील या कक्षाने आतापर्यंत २२ रुग्णांना तब्बल १७ लाख ३० हजार रुपयांची वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर २ मे २०२५ ला उद्घाटन झाले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा कक्ष जिल्ह्यातील अनेक गरजू आणि आर्थिक दुर्बल रुग्णांना खऱ्या अथनि जीवनदायी ठरत आहे.

गंभीर आजार किंवा अपघातग्रस्त कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय खर्च करावा लागतो. त्यांना हा कक्ष अशा गरजूंना आर्थिक पाठबळ देतो. आतापर्यंत या कक्षात ३३ गरजू रुग्णांनी मदतीसाठी अर्ज केले आहेत, त्यापैकी तीन अर्ज प्रलंबित आहेत. सात अर्ज कागदपत्रे अपूर्ण असल्याने नाकारण्यात आले आहेत. सहाय्यता निधीच्या पारदर्शक वितरणासाठी जिल्हास्तरावर समितीही स्थापन करण्यात आली आहे. ही समिती रुग्ण अर्जदारांना तत्काळ मदत देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आतापर्यंत १३ जणांना प्रत्येकी एक लाख रुपये आठ जणांना ५० हजार रुपये आणि एका रुग्णाला ३० हजार रुपये अशी मदत या कक्षाकडून देण्यात आली आहे.

रुग्णांनी लाभ घ्यावा
वार्षिक उत्पन्न १ लाख ६० हजारांच्या आत असल्यास संबंधितांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ घेता येतो. गरजूंनी लाभासाठी या जिल्हा कक्षाकडे संपर्क साधावा, असे समाजसेवा अधीक्षक अनिता पवार यांनी सूचित केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 24/Jul/2025