दापोलीत हृदयद्रावक घटना : साडीला आग लागून वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू!

रत्नागिरी, २४ जुलै : दापोली तालुक्यातील कोळथरे गोलांबडेवाडी येथे चूल पेटवत असताना साडीला आग लागून गंभीर भाजलेल्या सुनिता शांताराम फिलसे (वय ६८) या वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. २१ जुलै रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास सुनिता फिलसे या चुलीजवळ बसल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या साडीचा पदर चुलीत पडून पेट घेतला. यामुळे त्या गंभीर भाजल्या. शेजाऱ्यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मात्र, ८०% भाजल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान, २२ जुलै २०२५ रोजी पहाटे ३:५३ वाजता उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण ‘कार्डिओरेस्पिरेटरी अरेस्ट’ (Cardiorespiratory arrest) असे नमूद करण्यात आले आहे.

या घटनेची नोंद २३ जुलै २०२५ रोजी दाभोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे (आमृ. क्रमांक ०३/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे). या दुर्दैवी घटनेने फिलसे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 24-07-2025