घरात शिडीवरून पडलेल्या ६२ वर्षीय वृद्धाचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू!

रत्नागिरी, २४ जुलै: लांजा तालुक्यातील वेरवली खुर्द येथील उदय जयकृष्ण महाराव (वय ६२) या वृद्धाचा घरात शिडीवरून पाय घसरून पडल्याने झालेल्या दुखापतीमुळे पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. २३ जून रोजी ही दुर्घटना घडली होती आणि १३ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ जून २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास उदय महाराव हे आपल्या वेरवली येथील घराच्या मागील बाजूस शिडीवरून पाय घसरून पडले. यात त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

१२ जुलै २०२५ रोजी रात्री ८:५४ वाजता त्यांना पिंपरी, पुणे येथील वायसीएम हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये (ICU) दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच, १३ जुलै २०२५ रोजी दुपारी १:०० वाजता डॉ. अमित वाघ यांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद लांजा पोलीस ठाण्यात २३ जुलै रोजी सायंकाळी ६:५१ वाजता करण्यात आली आहे (अमू. क्र. ३८/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे). मृत्यूचे नेमके कारण रासायनिक तपासणी अहवाल (chemical analysis report) मिळाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे महाराव कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 24-07-2025