रत्नागिरी : थिबा राजाकालीन बुद्धविहार संदर्भात लवकरच तोडगा

चिपळूण : रत्नागिरी शहरातील राजा थिबा यांच्या काळातील बुद्धविहाराच्या आरक्षित जागेत सामूहिक केंद्र (कम्युनिटी सेंटर) उभारण्याबाबत झालेल्या विवादात्मक केली परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि थिबा राजाकालीन बुद्धविहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या संदर्भात लवकरच सन्मानजनक तोडगा काढला जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा महासंघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, रत्नागिरी येथील थिबा राजाचे बुद्धविहार प्रयोजनासाठी राखीव असलेल्या मिळकतीमध्ये बुद्धविहाराची निर्मिती करण्यात यावी. न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, बुद्धविहार जमिनीलगतच्या अन्य ठिकाणी प्रस्तावित सामूहिक केंद्र (कम्युनिटी सेंटर) उभारण्यात यावे, अशी मागणी महासंघाने केली.

रत्नागिरी येथील थिबाराजाचे बुद्धविहार या मिळकतीमध्ये प्रस्तावित सामूहिक केंद्राची उभारणी करताना जिल्ह्यातील विविध संघटनाअंतर्गत निर्माण झालेला वादविवाद संपुष्टात आणण्याच्या हेतूने शासन, प्रशासनाने पुढाकार घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोलपणे तपासणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

या वेळी जिल्हा बौद्धजन महासंघाचे सभापती विलास मोहिते, अध्यक्ष विठोबा पवार, सरचिटणीस चंद्रकांत तांबे, उपाध्यक्ष सिद्धार्थ सावंत यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 24/Jul/2025