दापोली : जैन साध्वींची चातुर्मासात ११ उपवासाची तपस्या

गावतळे : दापोली तालुक्यातील केळशी गावात जैन साध्वींचा चातुर्मास गुरुपौर्णिमेपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. या चातुर्मासातील ११ उपवासाची तपस्या पूर्ण झाली आहे.

चातुर्मास म्हणजे भक्ती करणे, स्वतःचा शोध घेणे, परिवर्तन करणे, तप करणे. रविवारी दापोली तालुक्यातील केळशी येथील महावीर भवन येथे भक्तांमर स्तोत्र संपुष्ट जप केला गेला. या जपामध्ये गावातील सर्व श्रावक-श्राविका उपस्थित होते. केळशीतील प्रतिष्ठित व्यापारी दिलीप बाबूलाल कोठारी यांनी ११ उपवासाचे तप केले. त्यांना कोकण सिंहनी परमपूज्य रश्मीनाजी महासतीजिनी उपवासाचे पचखाण दिले.

या उपवासाबाबत जैन आचार्य सांगतात की, उपवास हा आत्मज्ञानाचा एक भाग आहे. अन्न व इंद्रियविलासापासून दूर राहून आत्म्याच्या निर्मळ स्वरूपाचा अनुभव घेणे हेच खरे उपवासाचे प्रयोजन आहे.

तपाच्या १२ प्रकारांपैकी उपवास एक प्रकार आहे. उपवास करताना राग, लोभ, अभिमान, मोह यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे जैन धर्मात उपवासाला अत्युच्च स्थान दिले गेले आहे. केळशी येथील महावीर भवन येथे उपवास तप केल्याबद्दल जैन युवक मंडळातर्फे दिव्या दिलीप कोठारी यांनी सहा उपवास करण्याचे बोली घेऊन तपस्वी दिलीप कोठारी यांचा सत्कार केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 24/Jul/2025