चिपळूण : बहादूरशेखनाका येथील वाशिष्ठी नदीवरील जुना ब्रिटिशकालीन पूल तोडल्याने गणेश विसर्जनाची समस्या निर्माण झाली होती. विसर्जन घाटाची व्यवस्था न झाल्यास सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा इशारा माजी सभापती व पर्यावरणप्रेमी शौकत मुकादम यांनी दिला होता. या आंदोलनाची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून वाशिष्ठी पुलाजवळच कळंबस्ते येथे विसर्जन घाट रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील वाशिष्ठी नदीवरील ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाल्याने तो तोडण्यात आला. यापूर्वी ब्रिटिशकालीन पुलावरून वाशिष्ठी नदीत उतरण्यासाठी रस्ता तयार केला होता; मात्र आता पूल तोडल्याने गणेश विसर्जनाची समस्या निर्माण झाली होती.
बहादूरशेखनाका येथे वाशिष्ठी नदीत गणेश विसर्जनासाठी शहर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात, मात्र रस्त्याची व्यवस्था नसल्याने येथे विसर्जन घाट बांधण्यासाठी मागणी माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली होती. याकरिता मुकादम यांनी राष्ट्रीय महामार्ग तसेच तहसीलदार, प्रांत आणि पोलिस निरीक्षकांना निवेदन देत सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून फारशा हालचाली झाल्या नाही. शेवटी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी गणेश विसर्जन समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. बुधवारी सकाळी कळवंस्ते येथे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून गणेश विसर्जनासाठी रस्ता तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली. या कामाच्या ठिकाणी मुकादम यांनी भेट देत पाहणी केली. या वेळी कळंबस्ते सरपंच विकास गमरे, उपसरपंच गजानन महाडीक, माजी ग्रामपंचायत सदस्य यशवंत भुवड, सुरेश खेराडे, विलास पवार, काशिराम पवार उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 24/Jul/2025














