गणेशगुळे प्रभारी सरपंचपदी प्रसाद तोडणकर

पावस : तालुक्यातील गणेशगुळे ग्रामपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या महिला सरपंचांवर अविश्वासाचा ठराव दाखल करण्यात आला होता. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे तो मंजूर झाल्याने उपसरपंच प्रसाद सुनील तोडणकर यांची गणेशगुळेच्या प्रभारी सरपंचपदी निवड करण्यात आली.

थेट सरपंच निवडणुकीमध्ये महिला सरपंच निवडून देण्यात आली आणि ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्व राहिले. त्यामुळे सरपंचपदी श्रावणी रांगणकर यांची निवड झाली. उपसरपंचपदी तोडणकर यांची निवड झाली होती. अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये विद्यमान सरपंच यांनी मनमानी कारभारामुळे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्यांवर अविश्वासाचा ठराव दाखल केला; परंतु महिला सरपंचांविरोधात संपूर्ण पॅनेल असल्यामुळे त्यांनी ठरावाला सामोरे न जाता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

त्यामुळे त्या जागी निवडणूक होणार असल्याने तत्पूर्वी ग्रामपंचायत कारभार चालवण्याच्यादृष्टीने विद्यमान उपसरपंच तोडणकर यांच्याकडे प्रशासनाने प्रभारी सरपंच म्हणून कारभार सोपवला. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे गोळप विभागप्रमुख नंदकुमार मुरकर, उपविभागप्रमुख बंधू वारीसे यांच्या उपस्थितीमध्ये सरपंचपदी विराजमान करण्यात आले. या वेळी तोडणकर म्हणाले, दोन वर्षे मनमानी कारभारामुळे विकासाला खीळ बसली होती. ग्रामस्थांचे प्रश्न प्रलंबित होते व देण्यात आलेली आश्वासने पूर्णत्वाला गेली नव्हती. या सर्व गोष्टींची पूर्तता पूर्णत्वाला नेऊन ग्रामस्थांना कोणती अडचण येऊ न देता त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्राधान्याने विचार करणार असल्याचे सांगितले. या वेळी ग्रामपंचायत सदस्या रवी तेरवणकर, अश्विनी साळुंखे, सुषमा शिंदे, मंगला तोडणकर, अश्विनी जोशी, ग्रामस्थ आबा गुळेकर, अशोक साळुंखे, गिरीश लाड, आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 24/Jul/2025