लांजा: वेरवली बुद्रुक बौद्धवाडी येथील वीजखांब व वीज वाहिन्या धोकादायक

लांजा : तालुक्यातील वेरवली बुद्रुक बौद्धवाडी येथील वीजखांब व वीज वाहिन्या धोकादायक बनल्या असून अगदी हाताला लागतील इतक्या खाली आल्या आहेत. त्यामुळे संभाव्य दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न लोकांतून उपस्थित केला जात आहे.

वेरवली बुद्रुक बुद्धवाडी या ठिकाणी सन १९७४ साली महावितरण कंपनीमार्फत येथील ग्रामस्थांच्या सोयीसाठी वीज वाहिन्या आणि वीजखांब टाकण्यात आलेले आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या वीज वाहिन्या आणि वीज खांबांबाबत कोणत्याही प्रकारची दुरुस्ती किंवा वीज खांब आणि वीज वाहिन्या बदलण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने सध्या या वीज वाहिन्यांची अवस्था फारच बिकट बनली आहे .या वीज वाहिन्या जमिनीपासून केवळ दहा फूट लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. या वीज वाहिन्या वाहून नेणाऱ्या वीज खांबांमधील अंतर हे जास्त असल्याने हे वीजवाहिन्या लोंबकळलेल्या अवस्थेत खाली आलेल्या आहेत. यामुळे जनावरे तसेच माणसे यांना या वाहिन्यांचा स्पर्श होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या भागात अनेक शेतकऱ्यांची गोरे ढोरे तसेच बागायती आहेत, झाडे आहेत. अशा परिस्थितीत वीज वाहिनी तुटून किंवा वीज वाहिन्यांचा स्पर्श झाल्यास जीवितहानी होऊ शकते इतकी गंभीर परिस्थिती बनली आहे. मात्र महावितरणकडून अद्यापही या गंभीर समस्येकडे डोळसपणे पाहिले जात नाही. ही अतिशय खेदजनक बाब म्हणावी लागेल. म्हणूनच भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न लोकांमधून उपस्थित केला जात आहे.

अनेकदा महावितरणकडून आपली जबाबदारी झटकण्याचे प्रकार देखील सुरू आहेत. .त्यामुळे वेरवली बुद्रुक बुद्धवाडी या ठिकाणी धोकादायक बनलेल्या या वीज वाहिन्या आणि वीज खांबांबाबत महावितरणने तातडीने कार्यवाही करावी आणि संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 24-07-2025