दापोली : तालुक्यातील आसूद पूल येथे किरकोळ अपघातानंतर झालेल्या बाचाचाचीतून मारहाण करून मोबाईल चोरून नेल्याची घटना १३ ऑक्टोबरला रात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचे फिर्यादी फराज अन्वर रखांगे (वय ३१, रा. काळकाई कोंड) हे रविवारी आंबवली-मुरुड येथून दापोली येथे गाडीने येत होते. त्या वेळी समोरून येणाऱ्या गाडीने रखांगे यांच्या गाडीला उजव्या बाजूला धडक दिली. त्यानंतर रखांगे आणि धडक दिलेल्या गाडीतील विष्णू विठ्ठल वाघमारे, विक्रांत विठ्ठल मळेकर, श्रीकांत रमेश मळेकर (तिघेही रा. मोठी गोडीबाव, हर्णे) यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या तिघांनी रखांगे यांना तुम्हीच आमच्या गाडीचे नुकसान केल्याने भरपाई द्या, असे सांगितले.
या वेळी रखांगे यांनी समोरच्या तिघांना तुम्हाला नुकसान भरपाई देणार नाही तुम्हीच माझ्या गाडीला धडक दिली आहे. तुम्ही पोलिस ठाण्यात चला, असे सांगितले. या गोष्टीचा राग येऊन तिघांनी रखांगे यांना शिवीगाळ करून हाताच्या थापटाने मारहाण केली तसेच मोटारीच्या काचेचे नुकसान केले. त्या वेळी गाडीमध्ये रखांगे यांची पत्नी व मुलगी असल्याने ते घाबरले. मुलगी रडू लागली.
रखांगे यांनी सुरू असलेला प्रकार मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यास सुरवात केली तेव्हा विक्रांत मळेकर याने रखांगे यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि तिथून निघून गेले. या प्रकरणी रखांगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कुमार यादव करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 17/Oct/2024












