लांजा : शहरातील एकमेव असलेल्या सीएनजी पंपामधून योग्य प्रेशरने पुरवठा होत नसल्याने रिक्षाव्यवसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून शक्य असल्यास आणखी एका सीएनजी पंपाची व्यवस्था करावी अशी मागणी लांजा तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लांजा शहरात असलेल्या एकमेव सीएनजी पंपाबाबत रिक्षाव्यवसायिकांमधून गेल्या अनेक महिन्यांपासून नाराजीचा सूर उमटत आहे. हंगामी काळात आणि विशेषतः गणपती उत्सव, मे महिन्याच्या काळात ज्यावेळी रिक्षा व्यवसायिकांचा व्यवसाय असतो, त्यावेळी त्यांना पुरेशा प्रमाणात आणि प्रेशरने सीएनजी पुरवठा केला जात नाही. परिणामी या रिक्षाव्यवसायिकांना तासनतास आपला धंदा, व्यवसाय सोडून सीएनजी साठी रांगेत उभे राहावे लागते. याचा थेट परिणाम आमच्या रिक्षा व्यवसायावर होतो असे त्यांचे म्हणणे आहे.
मुंबई गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात सीएनजी वाहने धावत आहेत. लांजा येथे असलेल्या सीएनजी पंपावर रिक्षाव्यवसायिकांना सीएनजी साठी सात ते आठ तास रांगेत उभे राहावे लागते त्यात पूर्ण प्रेशरने सीएनजी उपलब्ध होत नाही. आणि यामुळे रिक्षा व्यावसायिक हैराण झालेले आहेत. सीएनजी उपलब्ध नसल्याने वाहनांच्या रात्रभर लांबच लांब रांगा लावलेल्या असतात. त्यामध्ये चार चाकी वाहनांसह रिक्षा व्यावसायिकांना सात ते आठ तास आपला व्यवसाय सोडून थांबावे लागत असल्याने मोठी गैरसोय होते. त्याचप्रमाणे व्यवसायावर मोठा परिणाम होतो असे त्यांचे म्हणणे आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 24/Jul/2025














