स्पर्धेच्या परिपत्रकाने शिक्षकांची तारांबळ

साखरपा : शासनाकडून अचानक आलेल्या स्पर्धांबाबतच्या परिपत्रकामुळे शिक्षकांची तारांबळ उडाली. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने या स्पर्धा घेण्यास अचानक सांगण्यात आले.

माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती गेली काही वर्षे वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. या निमित्त शाळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात; पण यावर्षी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून स्पर्धा घेण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले.

हे परिपत्रक वाचन प्रेरणा दिनाच्या आदल्या दिवशी रात्री उशिरा जारी करण्यात आले. त्यामुळे त्याबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही सूचना देणे शिक्षकांना शक्य झाले नाही. पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्याविषयी सांगण्यात आले. त्याचबरोबर घेण्यात आलेल्या स्पर्धांचे फोटो आणि अहवाल सादर करण्याविषयीच्या सूचनाही देण्यात आल्या.

त्यामुळे शिक्षकांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी कशी करायची याबाबत शिक्षकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. कोणतीही आगाऊ सूचना न दिल्यामुळे, तयारीसाठी वेळ न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे जिकिरीचे झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 17/Oct/2024