चिपळूण स्थानकावर पे अँड पार्कची जबाबदारी परप्रांतीयऐवजी स्थानिकांना द्यावी : मनसेची मागणी

चिपळूण : कोकण रेल्वेच्या चिपळूण स्थानकावर सुरू असलेल्या पे अँड पार्कची जबाबदारी परप्रांतीय ठेकेदाराला दिली असून, त्यांच्याबद्दल अनेकांच्या तक्रारी आल्या आहेत. रेल्वेसाठी स्थानिकांनी जमिनी दिल्या असून, त्यांना रोजगारापासून वंचित ठेवले जात आहे. मुजोर परप्रांतियांकडून हा ठेका काढून घेऊन तो स्थानिक तरुणांना दिला नाही, तर राज ठाकरे यांच्या आदेशाने रेल्वे स्थानक येथे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी आज (२४ जुलै) दिला आहे.

यासंदर्भात चिपळूण स्थानकाच्या रेल्वे रिजनल मॅनेजर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोकण रेल्वेच्या चिपळूण स्थानकावर सुरू असलेल्या पे अँड पार्क सेवेसाठी बाहेर राज्यातील परप्रांतीय युवक कार्यरत आहेत. येथील स्थानिक युवक सक्षम असूनही त्यांना या प्रकारच्या रोजगाराच्या संधीपासून दूर ठेवण्यात आले आहे. येथील रेल्वे साठी स्थानिक लोकांच्या जमिनी देल्या गेल्या आहेत; परंतु येथील स्थानिकांना या पे अँड पार्कचा ठेका न देता परप्रांतीयांना या पे अँड पार्कचा ठेका देण्यात आला. हा येथील स्थानिक (तरुण) लोकांवरती होणारा अन्याय आहे. परंतु या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अन्याय होवू देणार नाही.

मराठी माणसाला या ठिकाणी पहिल्यांदा न्याय मिळाला पाहिजे. असे झाले नाही तर महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने पे अँड पार्क इथे परप्रांतीयांना चालू देणार नाही. आज येथील असंख्य तरुण रोजगाराची संधी पाहत आहेत. परंतु ही संधी प्ररप्रांतीय हिसकावून घेणार असेल, तर त्याला महाराष्ट्र नव निर्माण सेना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.
आपण इथल्या स्थानिक तरुणांना हा ठेका देला नाही तर राज ठाकरे यांच्या आदेशाने रेल्वे स्थानक येथे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:35 PM 24/Jul/2025