चिपळूण : घरांसाठी गिरणी कामगारांचे निषेध आंदोलन

चिपळूण : गिरणी कामगारांच्या घरांसंदर्भात शासनाने राजकारण अवलंबिल्याने घरांचा प्रश्न सुटण्यास विलंब होत आहे. त्यामुळे गिरणी कामगारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने लालबाग येथील भारतमाता सिनेमा व त्यानंतर परेल येथील हुतात्मा बाबू गेनू स्मारक येथे निषेध आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनात कोकणातील गिरणी कामगारांच्या वारसांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत शासनाच्या धोरणांचा निषेध केला.

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष व आमदार सचिन अहीर यांनी केले. यावेळी आ. अहीर यांनी म्हाडा पडताळणीत अपात्रतेचे कारण पुढे करून घरे कमी करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

मात्र, शासनाचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. शेवटच्या कामगाराला घर मिळेपर्यंत लढा चालू राहील, अशी सडेतोड भूमिका मांडली. महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनचे सरचिटणीस जयप्रकाश भिलारे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, सेंच्युरी मिल कामगार एकता मंचचे अध्यक्ष नंदू पारकर, निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, अण्णा शिर्सेकर आदी कामगार नेत्यांनी सरकारवर टीका केली. आंदोलनात कामगार व वारसांनी काळ्या फिती लावून सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 17/Oct/2024