Breaking : रत्नागिरीत पोलिसांची मोठी कारवाई : ९० हजारांहून अधिक किमतीचे ‘ब्राऊन हेरॉईन’ जप्त, दोघांना अटक!

रत्नागिरी, [२४ जुलै, २०२५]: रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला आज मोठे यश मिळाले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या निर्देशानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धडाकेबाज कारवाई करत ९०,५०० रुपये किमतीचे ११ ग्रॅम ‘ब्राऊन हेरॉईन’ आणि इतर संबंधित साहित्य जप्त केले. या प्रकरणी राजीवडा येथील दोघांना अटक करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथक आज, २४ जुलै रोजी रत्नागिरी शहरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, राजीवडा ते कर्ला रोडवरील बुडये मोहल्ला परिसरात दोन संशयित व्यक्ती हातात पिशवी घेऊन फिरत आहेत.

​पथकाने तात्काळ या माहितीवर कार्यवाही करत मुस्तकीम युसुफ मुल्ला आणि मोहसीन नूरमोहम्मद फणसोपकर (दोघेही रा. राजीवडा) या दोघांना ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्यांच्याकडील पिशवीची तपासणी केली असता, त्यात ‘ब्राऊन हेरॉईन’ या अमली पदार्थाच्या १७५ पुड्या विक्रीसाठी आणल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ हेरॉईन आणि इतर मुद्देमाल जप्त केला.

​या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३१/२०२५ नुसार मुस्तकीम युसुफ मुल्ला आणि मोहसीन नूरमोहम्मद फणसोपकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्यासह श्रेणी. पो.उप.नि. श्री. संदीप ओगले, स.पो. फौ. सुभाष भागणे, पो. हवा. शांताराम झोरे, पो. हवा. नितीन डोमणे, पो. हवा. बाळू पालकर, म.पो. हवा. वैष्णवी यादव, पो.हवा. भैरवनाथ सवाईराम, पो. हवा. सत्यजीत दरेकर, पो. हवा. योगेश नार्वेकर, पो. हवा. विनायक राजवैद्य आणि चालक पो.कॉ. अतुल कांबळे यांनी पार पाडली. या कारवाईमुळे रत्नागिरीतील अमली पदार्थांच्या तस्करीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.