रत्नागिरी, २४ जुलै २०२५: रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे २३ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले आहेत. गणपतीपुळे गावाच्या पुढे, नेवरे गावाच्या अलीकडे हॅलिपॅडजवळच्या वळणावर हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अभय अभिमन्यु शिरगावकर (वय ५५, रा. निवेंडू, रत्नागिरी) हे आपली टाटा झेस्ट कार (एम.एच.०८/एजी/३८१२) घेऊन निवेंडी ते रत्नागिरी मार्गाने जात होते. गणपतीपुळे गावापुढील हॅलिपॅडजवळ वळणावर आल्यावर, रस्त्याची स्थिती लक्षात न घेता त्यांनी कार भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे चालवली. त्यामुळे त्यांची कार वळणावर विरुद्ध दिशेला गेली आणि समोरून येणाऱ्या मोटारसायकलला (एम.एच.०८/एडी/१९५८) जोरदार धडक दिली.
या अपघातात मोटारसायकलस्वार अथर्व जगदीप पाटील (वय १९, रा. सातारा, सध्या रत्नागिरी) आणि त्यांच्या पाठीमागे बसलेली त्यांची मैत्रीण अर्चना कृष्णा (वय २०, रा. पुणे, सध्या रत्नागिरी) हे दोघेही जखमी झाले आहेत. त्यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या असून, दोन्ही वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब), आणि मो.वा.का. १८४ अंतर्गत गुन्हा (गु.र.नं.१४६/२०२५) दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी, पोलीस हवालदार रोशन चंद्रकांत सुर्वे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. आरोपी अभय अभिमन्यु शिरगावकर यांना बीएनएसएस ३५(३) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 25-07-2025














