चिपळूण : संपूर्ण कोकणला भूषण असलेल्या श्रीकृष्ण व्याख्यानमालेचे ९७ वे वर्ष मातृशक्तीला समर्पित केले आहे. श्री लक्ष्मी नारायण देवस्थानची श्रीकृष्ण व्याख्यानमाला यावर्षी ९ ते १४ ऑगस्ट या काळात होणार असून यावर्षी सर्व सहा व्याख्यात्या महिला आहेत.
व्याख्यानमालेचा शुभारंभ मुंबई येथील डॉ. अभिधा घुमटकर या करणार असून त्यांच्या व्याख्यानाचा विषय ‘विज्ञानचा इतिहास’ असा आहे.
आपल्या जन्मांधतेवर मात करून त्यांनी इतिहास विषयात पीएचडी केली आहे व त्या मुंबईमधील नामांकित महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून सेवा करतात. शनिवारी त्यांचे व्याख्यान होणार आहे. १० ऑगस्ट रोजी नामवंत अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. आईचं घर उन्हात, घर तिघांचं हवं आणि ऑल दि बेस्ट अशा नाटकातून आपल्या अभिनयाने लोकप्रिय झालेली अभिनेत्री आज झगमगते विश्व सोडून कोकणात शेतीमध्ये रमली आहे. उच्च विद्याविभूषित असलेल्या जोगळेकर-कुळकर्णी ‘कलेतील आत्मभान’ या विषयावर विचार मांडणार आहेत. ११ रोजी पुण्याच्या सुनीताराजे पवार या ‘स्त्री काल आज आणि उद्या’ या विषयावर बोलणार आहेत.
संस्कृती प्रकाशन या नामवंत संस्थेच्या प्रकाशिका आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह असणाऱ्या राजे नामवंत वक्त्या म्हणून सर्वपरिचित आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलन समितीच्याही त्या कार्यवाह आहेत. १२ रोजी पुणे येथील डॉ. अर्चना गोडबोले यांच्या ‘कोकणातील देवराया- सद्यस्थिती व आव्हाने’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. डॉ. अर्चना गोडबोले पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. देवराई म्हणजे निसर्ग लोकजीवन आणि संस्कृती यांचा सुंदर संगम आहे. या विषयावर त्यांनी ‘देवराई आख्यान’ हे पुस्तक लिहिलेले आहे. १३ रोजी कोल्हापूर येथील मंजुश्री गोखले यांचे ‘तुक्याची आवली’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
कोल्हापूरमधून प्रसिद्ध होणाऱ्या नवस्नेह मासिकाच्या त्या संपादिका आहेत. तसेच त्यांची आजपर्यंत ५० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये ‘तुक्याची आवली’ ही गाजलेली कादंबरी आहे. तर व्याख्यानमालेतील यावर्षीचे अखेरचे व्याख्यान १४ रोजी जयसिंगपूरच्या डॉ. नीलम माणगावे यांचे ‘छोट्यांच्या मोठ्या गोष्टी’ या विषयावर होणार आहे. अनेक साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या नीलम माणगावे यांच्या कविता, कथा, कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. सामान्य माणूसही समाजासाठी किती मोठे काम करतो याचा प्रत्यय देणारे हे श्रवणीय व्याख्यान आहे. सर्व व्याख्याने दररोज सायंकाळी ६.३० वाजता सुरू होतील. तरी या सर्व व्याख्यानांचा लाभ श्रोत्यांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष ॲड. मकरंद साठे व सचिव सचिन कुलकर्णी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 25-07-2025














