मिरकरवाडा बंदराच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा २७ जुलैला! रत्नागिरीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवसंजीवनी

रत्नागिरी : जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या मिरकरवाडा मासेमारी बंदराच्या बहुप्रतिक्षित विकास कामांचा भूमिपूजन समारंभ रविवार, २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्या वतीने केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून, यामुळे रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसायाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे.

दिग्गजांच्या उपस्थितीत होणार भूमिपूजन
या महत्त्वपूर्ण सोहळ्याचे भूमिपूजन मत्स्यव्यवसाय तथा बंदरे मंत्री नितेश राणे आणि उद्योग, मराठी भाषा तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री योगेश कदम, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, आणि खासदार सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

याव्यतिरिक्त, विधानपरिषद सदस्य आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, चिपळूणचे आमदार शेखर निकम, गुहागर विधानसभेचे आमदार भास्कर जाधव, आणि लांजा-राजापूर विधानसभेचे आमदार किरण सामंत हे देखील उपस्थित राहणार आहेत.

मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, सचिव डॉ. रामास्वामी एन., रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांसह अनेक वरिष्ठ अधिकारीही या प्रसंगी उपस्थित राहतील. महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

मिरकरवाडा बंदराचा रखडलेला विकास अखेर मार्गी
मिरकरवाडा हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे बंदर असूनही, अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकामामुळे त्याचा विकास रखडला होता. मात्र, मत्स्यव्यवसाय तथा बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने २७ जानेवारी २०२५ रोजी या बंदरावरील जुनी अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसर मोकळा होऊन विकासाचा मार्ग प्रशस्त झाला.

१९८६ साली मिरकरवाडा बंदर बांधून पूर्ण झाले होते. त्यानंतर अनधिकृत बांधकामामुळे येथील विकासाला खीळ बसली होती. २०१३ मध्ये मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजनही झाले होते, परंतु अनेक कामे अपूर्ण राहिली होती. आता ना. नितेश राणे यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही सर्व अपूर्ण कामे पूर्णत्वास जाणार असल्याने रत्नागिरीतील मत्स्य व्यवसायाला एक नवीन झळाळी मिळणार आहे. या विकासामुळे केवळ जिल्ह्यालाच नव्हे, तर राज्याच्या आणि देशाच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होईल असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 25-07-2025