बदलापूर : गोमांस विक्रीच्या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने उचललेल्या कठोर पावलांचे प्रत्यंतर बदलापुरात दिसून आले आहे. जून महिन्यात गोमांस विक्री प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये आता मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याने अवैध गोमांस विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांच्या कारवाईनंतर मोक्काचा बडगा
बदलापूर ग्रामीण भागातील एका गावात पोलिसांनी छापा टाकून गोमांस जप्त केले होते. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी कसून तपास सुरू असतानाच, ८ जुलै रोजी कैफ ऊर्फ मन्सुर शेख याला अटक करण्यात यश आले. त्याच्या चौकशीतून अन्य आरोपींची आणि त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती समोर आली.
दरम्यान, कैफ मन्सुर शेख आणि उदली ऊर्फ सैफ मन्सुर शेख यांना न्यायालयाने २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आली होती, तर अन्य दोन आरोपींचा शोध सुरू होता. पोलीस पथकाला या दोन आरोपींना शोधण्यात यश आले आहे.
सरकारच्या आश्वासनानंतर तातडीने अंमलबजावणी
पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार, सचिन गोरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “या गुन्ह्यात आरोपींचा पूर्वेतिहास पाहता आता मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच गोमांस विक्री प्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.”
राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदेशीरपणे कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर लगेचच बदलापूरमध्ये ही मोठी कारवाई झाल्याने, अवैध गोमांस व्यवसायाला पायबंद घालण्यासाठी सरकार आणि पोलीस यंत्रणा कटिबद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारवाईमुळे भविष्यात अशा गुन्ह्यांवर अंकुश बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 25-07-2025














