संगमेश्वर : परतीच्या पावसाने संगमेश्वर, रत्नागिरीसह गुहागर तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. दोन ठिकाणी वीज पडून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संगमेश्वर खाडीपट्टयातील कोंडये- बोमेवाडीतील एकाच्या घरावर वीज कोसळून मोठे नुकसान झाले.
सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. मंगळवारी (ता. १५) दिवसभर कडकडीत ऊन पडले होते; मात्र सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण तयार झाले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्रामस्थांची तारांबळ उडाली, साडेआठच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. कोंडये बोमेवाडी येथील संजय दत्ताराम सावंत हे घराच्या पडवीत बसलेले होते.
त्यांची पत्नी निवेदिता या भांडी घासायला घरामध्ये जात होत्या. त्याचवेळी वीज कडकडली आणि लोळ घरामध्ये शिरला. पडवीत बसलेले संजय सावंत हे क्षणभर जागेवरच थीजून राहिले. सुरवातीला त्यांना वाटले की, विजेचा लोळ पत्नी निवेदिता यांच्यावर पडला; परंतु त्या दोन पावले पुढे गेल्या होत्या. दैव बलवत्तर म्हणून त्यांची पत्नी सुरक्षित बचावली. त्यांच्याबरोबरच घरामध्ये असलेले त्यांचे दोन्हीही मुलगे आतील खोलीत धावल्यामुळे सुरक्षित राहिले. विजेच्या लोळामुळे सर्व भिंतींना मोठे तडे गेले आहेत. घरातील सर्व वायरिंग, विद्युत मीटर, पाण्याची इलेक्ट्रिक मोटारही जळली. खोलीतील फॅन, फ्रिजचे मोठे नुकसान झाले आहे. विजेचा लोळ घराच्या छप्परातून बाहेर गेल्यामुळे त्यालाही तडे गेले. हा प्रकार समजल्यानंतर सरपंच, मंडळ अधिकारी, पोलिसपाटील, तलाठी, महावितरण कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामे सुरू केले आहेत. पावसाचा जोर १९ ऑक्टोबरपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 17/Oct/2024













