राजापूर नगर परिषदेच्या नवीन प्रभाग रचनेमुळे 10 प्रभागांतुन 20 नगरसेवक निवडले जाणार

राजापूर : तब्बल साडेतीन वर्षाच्या प्रशासकिय राजवटीनंतर निवडणूक विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत या निवडणूका होण्याची शक्यता असून त्याची प्रशासकिय प्रक्रिया सुरू झाली आहे.

राजापुरातही नगर परिषद निवडणूकीचे पडघम वाजू लागले असून प्रशासनाकडून प्रभाग रचनेसह अन्य प्रक्रियांचे काम वेगाने सुरू आहे. शासनाच्या नव्या निर्णयामुळे लोकनियुक्त नगराध्यक्षांसह नव्याने होणाऱ्या प्रभाग रचनेप्रमाणे आता राजापूर शहरांतील मतदारांना दहा प्रभागांतुन २० नगरसेवक निवडून देता येणार आहेत. त्यामुळे आता एक लोकनियुक्त नगराध्यक्ष, दहा प्रभागांतुन निवडून येणार २० नगरसेवक व त्यानंतर सभागृहाकडून दोन स्विकृत नगरसेवकांची होणारी निवड यामुळे आता नगर परिषदेच्या सभागृहात २३ लोकप्रतिनिधी शहरातील नागरिकांचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. त्यामुळे वाढलेली ही लोकप्रतिनिधींची संख्या भविष्यात राजापूर शहराच्या विकासाला कशा पध्दतीने गती देईल हे पहाणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

नव्या प्रारूप प्रभाग रचनेमध्ये प्रभागांसह नगरसेवकांची वाढणारी संख्या आणि त्यातून, बदलणारी राजकीय गणितं यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली असून आरक्षण सोडतीनंतरच खऱ्या अर्थाने राजकिय घडामोडींना वेग येणार आहे. स्थानिक नगर परिषद प्रशासनाकडून २५ जुलै ते २९ जुलै या कालावधीत प्रारूप प्रभाग रचनेचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर केले जाणार आहेत.
राजापूर नगर परिषदेत आता लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाहसह नगरसेवक पदांसाठी निवडणूक होणार आहे. नव्याने करण्यात येणाऱ्या प्रभाग रचनेत शहरात दहा प्रभागातुन प्रत्येक प्रभागातुन दोन या प्रमाणे २९ नगरसेवक निवडून येणार आहेत. या प्रभाग रचनेनंतर या नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदांसाठी आरक्षण सोडत होणार आहे. नगराध्यक्षपदासाठीची आरक्षण सोडत ही राज्य पातळीवर तर नगर सेवकांसाठीची आरक्षण सोडत ही नगर परिषद पातळीवर होणार आहे. राजापूर नगर परिषदेच्या निवडून द्यावयाच्या २० नगरसेवकांमध्ये ५० टक्के जागा या महिलांसाठी असणार आहेत. म्हणजे दहा जागा या महिलांना राखीव रहाणार आहेत. तर या २० जागांमध्ये एक जागा ही अनुसुचित जातींसाठी आरक्षित असणार असून पाच जागा या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असणार आहेत. त्यामुळे प्रारूप प्रभाग रचना, त्यानंतर हरकती अंतिम प्रभाग रचना, आरक्षण सोडत यानंतर खऱ्या अर्थाने राजापुरात राजकिय घडामोडींना वेग येणार आहे.

गेल्या साडेतीन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची गट-गण रचना नुकतीच जाहीर झाली. त्यापाठोपाठ आता नगर परिषदेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. यापुर्वी सन २०१६ मध्ये झालेल्या निवडणूकीमध्ये आठ प्रभागातील सतरा जागांसाठी लढती झाल्या होत्या. आता नव्या प्रारूप प्रभाग रचनेमध्ये पूर्वीच्या प्रभाग संख्येमध्ये दोनने वाढ होताना आठऐवजी दहा प्रभागसंख्या होणार आहे. त्याचवेळी नगरसेवकांची संख्येमध्येही तीनने वाढ होताना सतरावरून ती वीसवर जाणार आहे.

स्थानिक नगर परिषद प्रशासनाकडून २५ जुलै ते २९ जुलै या कालावधीत प्रारूप प्रभाग रचनेचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर केले जाणार आहेत. त्यानंतर ३० जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत राज्याच्या नगर विकास विभागाकडून हे प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केले जाणार आहेत. १८ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या कालाधीत प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द करून त्यावर हरकती व सुचना मागविल्या जाणार आहेत. तर २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत या प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर सुनावणी होणार आहे. या सुनावनी नंतर हरकती व सुचनांवरिल शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकारी यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना नगर विकास विभागाकडे २ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर या कालावधीत सादर केली जाणार आहे. त्यानंतर ९ ते १५ सप्टेंबर या कालावधीत प्राधिकृत अधिकारी यांनी सादर केलेली प्रभाग रचना नगर विकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या अंतिम मान्यतेनंतर २६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत अंतिम प्रभाग रचना अधिसुचनेद्वारे प्रसिध्द केली जाणार आहे.

या नवीन प्रभाग रचने नुसार राजापूर नगर परिषदेची आगामी पंचवार्षिक निवडणूक होणार असून लोकप्रतिनिधींची संख्या आता वाढणार आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार व आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ही नवीन प्रारूप प्रभाग रचना होणार आहे. एक लोकनियुक्त नगराध्यक्ष, २० नगरसेवक व त्यानंतर सभागृहात येणारे दोन स्विकृत नगरसेवक यामुळे सभागृहातील लोकप्रतिनिधींची संख्या २३ इतकी होणार आहे. नव्याने होणारी प्रभाग रचना, वाढणारी लोकप्रतिनिधींची संख्या विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या राजापूर शहराला विकासाच्या दिशेकडे नेईल का हे आगामी काळच ठरविणार आहे. मात्र नव्याने होणाऱ्या प्रभाग रचनांतुन होणाऱ्या निवडणूकीत यावेळीही चांगलीच रंगत येणार आहे हे मात्र नक्की. तर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह सभागृहातील वर्चस्वासाठी सर्वच राजकिय पक्षांचा या निवडणूकीत कस लागणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:04 25-07-2025