दापोली : कोकणातील देशी गायींचे जतन आणि संवर्धन ही केवळ शेतीपूरक बाब नसून, कोकणच्या शाश्वत विकासाचा मूळ मार्ग आहे. कोकण कपिला गायीचे संवर्धन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी केले.
कोकण कपिला गोवंश संवर्धनासाठी विद्यापीठ व जिल्हा पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गायींच्या संवर्धनासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेचा शुभारंभ कुलगुरू डॉ. संजय भावे आणि अहमदनगर येथील बन्सीगीर गोशाळेचे गोपाल सुतारिया यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. संजय भावे बोलत होते.
महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिल्यानंतर, पहिला वर्धापनदिन विद्यापीठाच्या विश्वेश्वरय्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
डॉ. भावे म्हणाले की, गायीचे संवर्धन ही संस्कृतीचा सन्मान असून, भविष्यासाठीचा विश्वास आहे. कलगुरुपद स्वीकारल्यानंतर निवासस्थानी गोठा बांधून दोन देशी गायींचे संगोपन सुरू केले आहे. दररोज सकाळी गायींची सेवा करण्याचे भाग्य मला मिळते, असे ते म्हणाले. प्रत्येक शेतकऱ्याने यामध्ये पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
देशी गायी म्हणजे भारतीय संस्कृतीचा आत्मा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधार आहे. गायींच्या संवर्धनातून गावात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. कोकण कपिला ही केवळ गाय नसून ग्रामीण जीवनाचा आत्मा आहे- गोपाल सुतारिया
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 25/Jul/2025














