राजापूर : तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत १३ गाव पांगरे बुद्रुक प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना डिसेंबर २०२५ अखेर पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजित असल्याची माहिती पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिवेशनामध्ये दिली. यामुळे गेली तीन वर्षे रखडलेली योजना लवकरच मार्गी लागणार आहे. मात्र, योजनेच्या कालावधीमध्ये वाढ झाल्याने २५ कोटींच्या योजनेसाठी आता सुमारे ३९ कोटी निधी लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आमदार सदाभाऊ खोत यांनी याबाबत अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित केला होता. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, या योजनेसाठी दिनांक ११ मे २०२२ रोजी सुमारे २५ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेतून १० ग्रामपंचायतीमधील १४ महसुली गावातील ९० वाड्यांना पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित असून, निविदेची मुदत दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत आहे.
मूळ मंजूर योजनेनुसार पुरवठा विहीर व जलशुद्धीकरण केंद्र खासगी मालकीच्या जागेत प्रस्तावित होते. परंतु, जागामालकांनी जागा देण्यास नकार दिला. त्यानंतर तांत्रिकबदल मान्यतेनंतर दि. २८ एप्रिल २०२४ रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.
वस्तू व सेवाकराच्या दरात वाढ तसेच तांत्रिक बदल यामुळे होणाऱ्या सुमारे २९ कोटी रूपये सुधारित योजनेला मुख्य अभियंता यांची दि. १३ मार्च २०२४ रोजी तांत्रिक मान्यता मिळाली आहे. योजनेत येत असलेल्या अडचणीच्या अनुषंगाने जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत स्तरावर बैठका घेण्यात येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 25/Jul/2025














