चिपळूण : दिव्यांग विद्यार्थ्यांकडून नागपंचमीसाठी आकर्षक मातीचे नाग विक्रीसाठी

चिपळूण : कोवॅस संचलित जयदीप मोने उद्योग केंद्र आणि जिद्द मतिमंद मुलांची शाळा येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी येत्या नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक मातीचे नाग तयार केले असून हे नाग विक्रीसाठी विविध ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. २९ जुलै रोजी नागपंचमी साजरी होणार असल्याने विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेऊन ही पारंपरिक प्रतिकृती साकारली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही या शाळेतील विद्यार्थी विविध वस्तू तयार करतात. त्यामध्ये फिनेल, लिक्विड सोप, हँडवॉश, डिशवॉश, ऑफिस फाईल्स, शुभेच्छा कार्डस, कागदी फुले, बुके, रांगोळी, उटणे, अगरबत्ती, कापूसवात, आकाशकंदील, मातीच्या पणत्या, राख्या, तिळाचे लाडू, सजावटीच्या वस्तू आणि यंदाचे वैशिष्ट्य ठरलेले मातीचे नाग यांचा समावेश आहे. नागपंचमी निमित्ताने हे मातीचे नाग अत्यंत स्वस्त दरात विक्रीस उपलब्ध असून नागरिकांनी ही उत्पादने खरेदी करून विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन उद्योग केंद्राचे व्यवस्थापक प्रशांत कोतळूककर आणि शाळेचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांनी केले आहे. हे सर्व मातीचे नाग कोवॅस बिल्डिंग, बहादूरशेख नाका येथील शाळेत विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत.

सदर उत्पादने चिपळूण शहरातील श्रीराम किराणा स्टोअर्स काविळतली, खरे किराणा स्टोअर्स रावतळे, चितळे किराणा दुकान गुरुकुल मागे, रेडीज प्रांत ऑफिस समोर, महाडीक – अभिषेक हॉटेल शेजारी, शिवदे दिलखुश चनाभट्टी, कदम कळंबस्ते नाका, चिपळूण बाजार, जिव्हाळा बाजार, महिला मंडळ वडनाका आदी ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांनी दाखवलेली कला, जिद्द आणि आत्मनिर्भरतेचा प्रयत्न समाजासमोर पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या हातून साकारलेल्या पर्यावरणस्नेही मातीच्या नागांची खरेदी करून सामाजिक भान जपण्याचे आवाहन कोवॅस संस्थेने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:53 PM 25/Jul/2025