संगमेश्वर : मुरादपूर तिठा येथे खासगी केबल कंपनीकडून भरपावसाळ्यात रस्ता खोदाई

देवरुख : साखरपा ते संगमेश्वर दरम्यान मुरादपूर तिठा येथे संगमेश्वर तालुक्याच्या संबंधित विभागाची आवश्यक ती परवानगी न घेता ऐन पावसाळ्यामध्ये चक्क रस्ता खोदून तसेच रस्त्याच्या बाजूने खोदाई करून खासगी कंपनीकडून केबल टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांनी याबाबत काम थांबवण्याचा दणकाच दिला आहे. देवरूख पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदय झावरे तसेच सचिन कामेरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. अनधिकृत रस्ता खोदाई होत असल्यामुळे तालुकाध्यक्ष शेखर जोगळे, प्रशांत विंचू, माथाडी कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस शेखर नलावडे यांना माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवरूख तसेच पोलिस ठाण्याला याबाबत माहिती दिली. यानंतर प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यात येऊन संबंधित काम थांबविण्यात आले. कंपनीवर कारवाई करण्यात यावी व पूर्वीप्रमाणे रस्ता व्यवस्थित करावा.

पूर्वपरवानगीशिवाय तसेच पावसाळ्यात अपघात होण्याचा संभव असल्याने सदर काम करू नये, असे आदेश बांधकाम विभागाकडून संबंधित कंपनीला देण्यात आले आहेत. मनमानी कारभार होत असून जनतेला वेठीस धरण्यात येत आहे. अशाप्रकारे खोदकाम होत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे मनोहर गुरव यांनी सांगितले. यावेळी सुनील करंडे, प्रकाश खांडेकर, प्रशांत ऊर्फ बाबू विंचू उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:03 PM 25/Jul/2025