दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांना आज एका विशेष समारंभात संरक्षण मंत्रालयाने कर्नल कमांडंट (एनसीसी) हे मानद पद प्रदान केले. डॉ. भावे यांच्या एनसीसीमधील भरीव कार्याची दखल घेऊन त्यांना हा बहुमान देण्यात आला आहे.
एनसीसीचे ग्रुप कमांडर ब्रिगेडीअर आर. के. पैठणकर आणि कराड येथील एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर सत्यशील बाबर यांनी डॉ. भावे यांच्या सैनिकी गणवेशाच्या शोल्डरवर या पदाच्या फिती लावून त्यांना गौरवले.
या प्रसंगी चिपळूणचे आमदार शेखर निकम, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जालगावकर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सावर्डेकर, सर्व संचालक आणि अधिकारी उपस्थित होते. या मान्यवरांनी डॉ. भावे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोकण कृषी विद्यापीठात रुजू झाल्यापासून डॉ. संजय भावे यांनी सात वर्षे एनसीसीचे सहयोगी राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी म्हणून काम केले होते. त्यांनी विद्यापीठातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये सहभागी होण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाला आदराने संरक्षण मंत्रालयाने या मानद पदाद्वारे गौरवले आहे. डॉ. भावे जोपर्यंत कुलगुरू पदावर कार्यरत असतील, तोपर्यंत त्यांना हे मानद कर्नल कमांडंट पद भूषवता येणार आहे.
या सन्मानामुळे कोकण कृषी विद्यापीठासह संपूर्ण कोकण विभागासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:25 25-07-2025














