रत्नागिरी, [२५ जुलै, २०२५]: रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला कक्षात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस हेड कॉन्स्टेबलचा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल असताना आकस्मिक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेत तिचे बाळही दगावले असून, सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सांची सुदेश सावंत (वय ३८, रा. हेरिटेज सोसायटी, आरोग्य मंदिर, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सांची नऊ महिन्यांची गरोदर होती. गुरुवारी रात्री तिच्या नातेवाईकांनी तिला प्रसूतीसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे तिला अचानकपणे आकडी येऊन ती बेशुद्ध पडली. अधिक उपचारांसाठी तिला रत्नागिरीतील दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे उपचार सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी ३.१८ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
सांची सावंत हिचे पतीही पोलीस दलात श्वान पथकात पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. या दाम्पत्याला आधीच दोन मुली आहेत. सांची तिसऱ्यांदा गरोदर असताना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली होती. परंतु, आज सकाळी तिला आकडी येऊन ती बेशुद्ध पडल्याने तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले होते, जिथे तिने अखेरचा श्वास घेतला. दुर्दैवाने, तिचे बाळही वाचू शकले नाही.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक कार्यालय, शहर पोलीस ठाणे, श्वान पथकातील पोलीस कर्मचारी तसेच शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास सांचीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.













