रत्नागिरी : दहावीचा निकाल १३ मे रोजी ऑनलाइन लागला; मात्र अकरावी प्रवेश ऑनलाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतला; परंतु हा निर्णय अपयशी ठरल्याचे दिसत असून, त्वरित सर्व अडचणी दूर करून लवकरात लवकर शैक्षणिक कामकाज सुरू करण्यासाठी बजरंग दल दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. एक आठवड्यात याबाबत निर्णय न झाल्यास बजरंग दल आंदोलन करेल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन देण्यासाठी हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना बजरंग दलाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक विराज चव्हाण, विश्व हिंदू परिषदचे सचिन रेमणे आणि गौरव झगडे यांनी दिले. या निवेदनात म्हटले आहे की, बजरंग दल हे तरुणांसाठी सेवा, सुरक्षा आणि संस्कार या त्रिसूत्रीवर काम करणारे संघटन आहे. १७ मार्च रोजी दहावीची परीक्षा संपली, १३ मे रोजी निकाल लागला ही अभिनंदनीय बाब; परंतु १३ मे नंतर आता अडीच महिने झाले तरी अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रियाच पूर्ण झालेली नाही.
ऑनलाइन प्रवेशपद्धतीमधील त्रुटींचा सामना करत विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत. आतापर्यंत तीनवेळा यादी प्रसिद्ध झाली असूनही ४० टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला आहे.
८० ते ९० टक्के व त्याहूनही जादा टक्के असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशच मिळाला नसल्याने हे विद्यार्थी व पालक महाविद्यालय, शैक्षणिक संस्थांमध्ये चौकशी करत आहेत. त्यामुळे ऑनलाइन प्रक्रियेचे वेळापत्रक कोलमडले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 26/Jul/2025














