आयशर टेम्पो आणि एसटी बसची धडक, अनेक प्रवासी जखमी; टेम्पो चालक फरार

राजापूर : २५ जुलै २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजण्याच्या सुमारास राजापूर तालुक्यातील सौंदळ ग्रामपंचायतीसमोर ओणी ते पाचल मार्गावर एक भीषण अपघात घडला. एका आयशर टेम्पोने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यात एसटी बसमधील अनेक प्रवासी तसेच आयशर टेम्पोमधील एका व्यक्तीला लहान-मोठ्या दुखापती झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रामदास हरिश्चंद्र देशमुख (वय ३८, रा. वाशिम, सध्या एस.टी. डेपो राजापूर) हे आपल्या ताब्यातील एम.एच.२० बी.एल. २२७१ क्रमांकाची आजिवली ते रत्नागिरी जाणारी एसटी बस चालवत होते. सौंदळ ग्रामपंचायतीसमोर चढणीवर येत असताना, एम.एच.०९/जी.जे./३८८० क्रमांकाच्या आयशर टेम्पोचा चालक बाळाप्पा रामचंद्र हगेद (वय ५५, रा. कणेरी, कोल्हापूर) याने आपला टेम्पो हयगईने, निष्काळजीपणे आणि अतिवेगाने चालवून एसटी बसला जोरदार धडक दिली.

या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, एसटी बसमधील अनेक प्रवाशांना आणि आयशर टेम्पोमधील प्रतीक तानाजी संकपाळ (रा. कोल्हापूर) यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या. जखमींमध्ये अथर्व मारुती लिंगायत (रा. रायपाटण), सौ. स्वाती ऋषिकेश चव्हाण (रा. तळवडे), सौ. प्रतिभा दिनेश चव्हाण (रा. तळवडे), देवांश दिनेश चव्हाण (रा. तळवडे), फिर्यादी रामदास हरिश्चंद्र देशमुख आणि एसटी बसचे वाहक विजय संभाजी शिंदेदेसाई यांचा समावेश आहे. हे सर्वजण किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघात घडवल्यानंतर टेम्पो चालक बाळाप्पा हगेद याने अपघाताची खबर न देता आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता घटनास्थळावरून पळ काढला.

राजापूर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १३६/२०२५, तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४/१७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 26-07-2025