संगमेश्वर : डिंगणी श्री केदारेश्वर विद्यामंदिरत सापांची ओळख मार्गदर्शन कार्यक्रम

देवरुख : सापांची ओळख, माहिती, समज-गैरसमज विषयावर या स्वस्तिक युवा प्रतिष्ठानतर्फे संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी येथील विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमातून सापांविषयी अज्ञान आणि भीती दूर करण्यात आली.

स्वस्तिक युवा प्रतिष्ठानचे सर्पमित्र राजा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना सापांची ओळख करुन दिली. विषारी आणि बिनविषारी साप कसे ओळखायचे? याविषयी विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती दिली. सर्पदंश झाल्यानंतर कोणते प्रथमोपचार आणि काळजी घ्यायची याचे प्रोजेक्टरच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रश्न विचारले असता गायकवाड यांनी शंकांचे निरसन केले. साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून त्याला विनाकारण मारू नका, असा मोलाचा संदेश दिला.

जिल्हा परिषद डिंगणी गुरववाडीचे शिक्षक अजिंक्य नाफडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. स्वस्तिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सापांविषयी ओळख आणि माहिती मिळावी यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांमध्ये अशा अभिनव कार्यक्रमाचे आयोजन होणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगितले.

या कार्यक्रमाला स्वस्तिकचे उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश (बाबू) मोरे व महेंद्र पेंढारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद डिंगणी, गुरववाडी आणि केदारेश्वर माध्यमिक विद्यालय, डिंगणी येथील विद्यार्थ्यांनी लाभघेतला. या कार्यक्रमाला मधुकर वाजे, संजय तटकरे, अमोल तोतला, योगेश बडे उपस्थित होते. अजिंक्य नाफडे यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 26/Jul/2025