रत्नागिरी : जिल्हा नियोजन समिती कार्यालयाला गळती

रत्नागिरी : जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करणाऱ्या जिल्हा नियोजन समिती कार्यालयाला गळती लागली आहे. गळतीचे पाणी कार्यालयात पसरू नये यासाठी बादल्या लावण्याची वेळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आल्याने ते हैराण आहेत.

जिल्हा नियोजन विभागाचे कार्यालय जुन्या इमारतीमध्ये असले तरी ते कॉर्पोरेट बनवण्यात आले आहे. लाखो रुपये या कार्यालयाच्या नूतनीकरणावर यापूर्वी खर्च झाले आहेत. जिल्ह्याच्या सुमारे ४१० कोटीच्या विकास आराखड्याचे नियोजन या कार्यालयाकडे असले तरी आज या कार्यालयाची अवस्था बिकट आहे. पावसामुळे या कार्यालयामध्ये ठिबक सिंचनाप्रमाणे गळती लागली आहे. अधिकाऱ्यांच्या टेवलच्या बाजूलाच छतामधून पाणी गळत असल्याने अधिकारी हैराण आहेत.

या गळतीमुळे कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे सांभाळण्यासाठी त्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. गळतीचे पाणी कार्यालयात पसरू नये यासाठी सध्यातरी सर्वत्र बादल्या लावण्यात आल्या आहेत.

गळतीमुळे पीओपीची सीटदेखील निखळून पडली आहे. याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 26/Jul/2025