शेती उत्पन्नासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा : मंडल कृषी अधिकारी दत्तात्रय आवारे

सावर्डे : ‘शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता अधिक उत्पन्नासाठी शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे, ही काळाची गरज आहे. त्यासाठी कलम तंत्रज्ञान हे फळबाग शेतकऱ्यांसाठी वरदान असून, यामुळे पिकांचे गुण आणि उत्पादन दोन्ही वाढते, असे प्रतिपादन मार्गताम्हाणे (ता. चिपळूण) येथील मंडल कृषी अधिकारी दत्तात्रय आवारे यांनी केले.

रामपूर येथील शेतकऱ्यांसाठी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथील ‘जय किसान ग्रुप “च्या कृषिदूतांनी शेतकऱ्यांना फळपिकांमध्ये कलम कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखवले. या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला उपकृषी अधिकारी दत्तात्रय काळे, सहाय्यक कृषी अधिकारी पंकज कणसे, ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्राध्यापक प्रशांत इंगवले व प्राध्यापक रोशन मोहिरे उपस्थित होते. या प्रसंगी कृषिदूतांनी प्रात्यक्षिकाद्वारे फांदीकलम, डोळा कलम आणि भेट कलम या पद्धतींची माहिती दिली. त्यांनी कलमासाठी योग्य वेळ, कलमासाठी आवश्यक असलेला धारदार चाकू, प्लास्टिक टेप आणि इतर साधनांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘जय किसान ग्रुप’चे कृषिदूत, वैभव पवळ, तेजस चोथे, उदयनराजे भोसले, मंगेश पिसे, विराज कणसे, भारतकुमार बिराजदार, प्रतीक माळी, तुषार भाबड, पुरुषोत्तम माळी, अमित माळी, ओंकार भापकर यांनी या प्रात्यक्षिकासाठी सक्रिय सहभाग घेतला.

खत व्यवस्थापनावर मार्गदर्शन
कलम केल्यानंतर त्याची योग्य निगा कशी राखावी, कीडरोगांपासून संरक्षण कसे करावे आणि कलमाच्या यशस्वी वाढीसाठी आवश्यक असलेल्या माती आणि खतांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत कृषिदूतांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 26/Jul/2025