पीएम मोदींमध्ये दम नाही, मीडियाने त्यांना मोठं केलंय : राहुल गांधी

Rahul Gandhi on Narendra Modi : “पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये दम नाही, मीडियानेच त्यांना मोठं केलंय”, अशी टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) केलीये.

दिल्लीतील ओबीसींच्या भागिदारी न्याय महासंमेलनात ते बोलत होते. मोदी ही काय समस्या नाही, मीडियानेच त्यांना मोठं केलंय, असंही यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधींचा हा व्हिडीओ ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन शेअर केलाय.

राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी म्हणजे काय मोठी समस्या नाही. मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही डोक्यावर बसवलंय. मीडिया वाल्यांनी फुगा बनवलाय. पूर्वी तर मी भेटलो नव्हतो. आता मी दोन-तीन वेळेस भेटलो आहे. मला आता समजलं आहे, त्यांच्यामध्ये काही नाही. सगळा शो आहे, काही दम नाही. तुम्ही त्यांना भेटले नाहीत, मी भेटलोय. रुममध्ये बसलोय.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, मी 2004 पासून राजकारणात आहे. आता 21 वर्ष झाले आहेत. मी मागे वळून पाहातो आणि आत्मपरिक्षण करतो. मी कुठे काम योग्य काम केलं आणि कुठे कमतरता होती, हे मी पाहातो. त्यावेळी मला दोन-तीन गोष्टी जाणवतात. आम्ही जमीन अधिकरण कायदा केला. मनरेगा योजना आणली. आम्ही ट्रायबल बिल देखील पास केलं. या बाबी मी योग्य केल्या. मात्र, एक गोष्ट मला क्लिअर दिसते. माझ्याकडून एक गोष्ट करायची राहिली. मी ओबीसी वर्गाचं संरक्षण करु शकलो नाही. मला पश्चाताप होतोय की, तुमच्या इतिहासाबाबत आणि तुमच्या समस्यांबाबत थोडीशी माहिती असती तर मी तेव्हाच जातनिहाय जनगणना केली असती. मी स्टेजवरुन सांगतोय. ती माझी चूक होती. मी ती चूक सुधारायला चाललो आहे.

जातीनिहाय जनगणना हे माझं पहिलं पाऊल आहे. तुम्ही राहुल गांधी, राहुल गांधी म्हणत असता. मात्र, तुमच्या शक्तीशिवाय राहुल गांधी काहीच नाही. देशातील ओबीसी वर्गाला मी सांगू इच्छितो की, मला ज्याप्रकारे ओबीसी वर्गासाठी काम करायला हवं होतं. ते मी केलं नाही. मात्र, आता मी डबल स्पीडने काम करण्यासाठी चाललो आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 26-07-2025