Ratnagiri : मुसळधार पावसामुळे शेती कामांमध्ये बदल करण्याचे आवाहन

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हवामानावर आधारित कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात 25 व 26 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, 27 ते 29 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यातील हवामानाचा आढावा (18 ते 24 जुलै 2025):
गेल्या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 374.8 मिमी पाऊस झाला आहे. 1 जानेवारी 2025 पासून आजपर्यंत एकूण 2594.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीत 4308.3 मिमी पाऊस झाला होता. या कालावधीत कमाल तापमान 26.7 ते 29.4 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 20 ते 22.1 अंश सेल्सिअस दरम्यान होते. सकाळची सापेक्ष आर्द्रता 84 ते 98 टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 84 ते 95 टक्के होती. वाऱ्याचा वेग 3.6 ते 11.3 किमी/तास होता आणि वाऱ्याची दिशा 253 ते 258 अंश होती.

हवामानाचा शेतीवर संभाव्य परिणाम आणि कृषी सल्ला:
मुसळधार ते अति मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे सर्व पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापन, कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या फवारण्या, आंबा पिकाला देण्यात येणारी पॅक्लोब्युट्रॉझॉलची मात्रा आणि विविध पिकांना देण्यात येणाऱ्या खतांच्या मात्रा वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील कृषी सल्ला मिळेपर्यंत ही सर्व कामे पुढे ढकलण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पिकनिहाय विशेष सल्ला:
* सामान्य सल्ला: नवीन लागवड केलेली आणि साधारणतः 2 वर्षांपर्यंतची आंबा व काजू कलमे, तसेच नारळ व सुपारीची रोपे कोसळू नयेत यासाठी बांबूच्या काठीचा आधार द्यावा. लागवड केलेल्या सर्व पिकांमधून पावसामुळे साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
* खरीप भात (पुनर्लागवड / रोपावस्था): भाताच्या पुनर्लागवडीची कामे पूर्ण करून घ्यावीत. ही कामे पावसाची तीव्रता कमी असताना करावीत. 12 ते 15 सेमी उंचीची आणि 5 ते 6 पाने फुटलेली, जातींच्या पक्वता कालावधीनुसार 21 ते 27 दिवसांची रोपे लावणीसाठी वापरावीत. पुनर्लागवडीनंतर पहिल्या 30 दिवसांपर्यंत शेतात पाण्याची पातळी 2.5 ते 5 सेमी ठेवावी आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. जमिनीच्या मगदुराप्रमाणे लावणी 15×15 किंवा 20×15 सेमी अंतरावर करावी. एका चुडामध्ये 2 ते 3 रोपे लावावीत आणि संकरित भातासाठी एका ठिकाणी एकच रोप लावावे.
* भात पिकास चिखलणीच्या वेळी हेक्टरी 40 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे. हेक्टरी 5 टन गिरीपुष्पाचा पाला दिल्यास 50% नत्र खताची मात्रा कमी करता येते.
* डोंगर उतारावरून भात खाचरांमध्ये तीव्र वेगाने पाणी येत असल्यास ते पाणी इतरत्र वळवण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून नव्याने लागवड केलेली भात रोपे वाहून जाणार नाहीत.
* नागली, वरी (पुनर्लागवड / रोपवाटिका व्यवस्थापन): नागलीच्या अधिक उत्पादनासाठी सपाट व चांगला निचरा होणाऱ्या जमिनीसाठी 25 सेमी x 10 सेमी अंतरावर पुनर्लागवड करावी. हेक्टरी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे. नत्र खत दोन हप्त्यात विभागून द्यावे. पाऊसाच्या अतिरिक्त साचलेल्या पाण्याने नागली रोपवाटिकेत नुकसान होऊ शकते, यासाठी पाण्याचा निचरा करावा.
* नवीन लागवड (नारळ, आंबा, काजू, सुपारी): नवीन लागवड केलेल्या नारळ, आंबा आणि काजू रोपांना/कलमांना बांबूच्या काठीचा आधार द्यावा. जास्त पाऊस झाल्यास नवीन लागवड केलेल्या रोपांमध्ये मर वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे लागवड क्षेत्रातून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
* हळद: हळद पिकामध्ये पावसामुळे अतिरिक्त पाणी साचले असल्यास त्याचा निचरा करावा.
* वेलवर्गीय भाजीपाला (पडवळ, कारली, दुधी भोपळा, शिराळी): ही पिके वेल टाकू लागल्यावर त्यांना शिऱ्या लावून आधार द्यावा आणि मंडपाची व्यवस्था करावी. लागवड केलेल्या वेलवर्गीय भाजीपाला पिकातून अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.

पशुधन आणि कुक्कुटपालन:
कोंबड्यांचे आणि जनावरांचे पावसापासून योग्य ते संरक्षण करावे.
हा कृषी सल्ला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करून प्रसारित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विद्यापीठाचे केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:03 26-07-2025