टी-शर्टवरील गावाच्या नावाने पटली लांजा येथील मृत वृद्धाची ओळख

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे येथे रेल्वे बोगद्यात लांजा येथील वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. २४ रोजी घडली होती. मृत वृद्धाचे नाव सीताराम भिवा दरडे (७०, रा. आडवली चौक, लांजा) असे आहे. त्यांच्या टी-शर्टवर त्यांच्या गावाचे नाव होते. त्यावरून माहिती घेताना पोलिसांना मृत व्यक्तीची ओळख पटवणे सोपे झाले.

सीताराम दरडे वाडीकडे जाणारी वाट चुकल्याने घाटीवळे रेल्वे ट्रॅकच्या दिशेने गेले. गुरुवारी दुपारी ३ वाजता ते ट्रॅकवरुन चालत जात असताना घाटीवळे बोगद्यामध्ये रत्नागिरीकडून येणाऱ्या मंगला एक्स्प्रेसची धडक दरडे यांना बसली. या धडकेत दरडे यांचा मृत्यू झाला.

देवरूखचे पोलिस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केला. यावेळी सहायक उपनिरीक्षक एस. एस. पंदेरे, हेडकॉन्स्टेबल प्रशांत मसुरकर, सचिन कामेरकर, संजय कारंडे, कॉन्स्टेबल रेणुका कांबळे उपस्थित होत्या.

याप्रकरणी देवरुख पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर या मृतदेहाची ओळख पटविण्याच्या दृष्टीने तपास सुरु केला होता. मात्र, रेल्वे ट्रॅकनजीक मृतदेह सापडल्यानंतर त्याची ओळख पटवणे हे पोलिसांसमोरील मुख्य आव्हान असते. मात्र, सीताराम दरडे यांनी गावाच्या नावाचे टी-शर्ट परिधान केले होते. त्यावरून पोलिसांनी माहिती घेतली त्यानंतर त्यांची ओळख पटली. देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 26/Jul/2025