चिपळूण : येथील परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांच्या वतीने सोमवारी ‘एक राखी देशासाठी’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे. शाळेच्या अंगीकृत रचनेत जेवढे महत्त्व अध्यापनाला आहे तेवढेच महत्त्व सहशालेय उपक्रमाला आहे. या अनुषंगाने “माझा देश, मी देशाचा” ही संकल्पना संस्थेत आकार घेत आहे. रक्षाबंधनाचा उत्सव हा जागृतीसाठी जोडण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी (दि. २८) रोजी सकाळी १०.३० वाजता सर्व पालक सैनिकांचे कुटुंबीय, काही माजी सैनिक, पालक, पालक-प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शाळेच्या प्रवेशद्वारामध्ये सरस्वती पूजन व मातृभूमी प्रतिमा यांचे पूजन होऊन विद्यार्थी फेरीला सुरुवात होईल. इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. युनायटेड इंग्लिश स्कूल व गद्रे इंग्रजी माध्यमाच्या प्रशालेतील साधारण ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. सकाळी १०.४५ वाजता शाळेतील इतर इयत्तांचे विद्यार्थी आपल्या हातामध्ये रक्षासूत्र बांधून या फेरीला निरोप देतील. सकाळी ११.३० ही विद्यार्थी फेरी पोस्ट कार्यालयापर्यंत पोहोचेल. त्या ठिकाणी चिपळूण मधील विभाग स्तरावरील प्रशासकीय अधिकारी तसेच तालुकास्तरीय प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते या राख्यांची पाकिटे पोस्ट अधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात येतील. यावेळी सर्वजण भारताची प्रतिज्ञा म्हणतील व महाराष्ट्र गीत होईल. यानंतर ही विद्यार्थी फेरी परत चिपळूण कराड रोडने शाळेकडे येईल. शाळा प्रवेशद्वारामध्ये सुरेश दामोदर गद्रे इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांकडून सर्वांचे स्वागत होईल. यानंतर खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता होईल. त्याच दिवशी शाळेच्या संकुलातील ४००० विद्यार्थ्यांचेही रक्षाबंधन होईल.
परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या चिपळूण संकुलामध्ये साधारण ४२०० विद्यार्थी नित्यशिक्षण घेत आहेत. त्यांच्या पालकांमध्ये जे वडील पालक भारतीय सैन्यात कार्यरत आहे त्यांना रक्षासूत्र पाठवण्यात येणार आहे. यामुळे त्या सैनिकांनाही थोडी ऊर्जा मिळेल. तसेच शाळेमध्ये माझ्या मित्राचे बाबा भारतीय सीमेवर आपले रक्षण करत आहे आणि त्यामुळे आपण सुरक्षित आहोत याची कल्पना विद्यार्थ्यांना येईल. विद्यार्थी मनाच्या अस्मितेला राष्ट्र भावनेशी सहज जोडता येऊ शकेल अशी यामागची भावना असल्याचे शाळेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:56 PM 26/Jul/2025














