मिरकरवाडा बंदराला आदर्श मासेमारी केंद्रात रूपांतरित करणार: पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी: राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांनी आज मिरकरवाडा बंदराच्या विकासकामाच्या भूमिपूजन समारंभात हजेरी लावली. यावेळी बोलताना, मिरकरवाडा बंदराचा विकास हे आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि समाधानाचे क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
सामंत यांनी अधोरेखित केले की, मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी गेली २० वर्षे सातत्याने प्रयत्न सुरू होते, परंतु या कामाला खऱ्या अर्थाने गती कोकणातील सुपुत्राला मंत्रिपद मिळाल्यानंतरच मिळाली. यासाठी त्यांनी सर्व मच्छीमार बांधवांच्या वतीने आमदार नितेश राणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
मंत्री सामंत यांनी कोकणातील मच्छीमार बांधवांना न्याय मिळावा आणि त्यांचे दिवस चांगले यावेत यावर ठाम मत व्यक्त केले. त्यांनी मिरकरवाड्यातील मुस्लिम बांधवांच्या देशभक्तीचे कौतुक केले, जे गेल्या २५-३० वर्षांपासून स्वातंत्र्यदिनी जवानांसाठी रक्तदान करत आहेत – हीच खरी भारतभक्ती आणि माणुसकी असल्याचे ते म्हणाले.
आज मिरकरवाड्यातून हजारो कोटींचा मासळी व्यवसाय होतो. हाच व्यवसाय अधिक सशक्त आणि सुव्यवस्थित करण्यासाठी त्याला ‘कृषी व्यवसाय’ म्हणून दर्जा मिळावा अशी भूमिका सामंत यांनी मांडली. तसेच, किनारपट्टीवर टाकले जाणारे काँक्रीटचे दगड योग्य दर्जाचे आहेत की नाही, यावर आपले लक्ष असून यामध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मा. ना. उदयजी सामंत म्हणाले की, “विधान परिषदेतील नितेश राणे यांचे मच्छीमार बांधवांसाठीचे भाषण ऐकल्यास सर्वांचे गैरसमज दूर होतील. मच्छीमार हा माझ्यासाठी केवळ व्यवसाय करणारा नसून तो माझा परिवार आहे. त्यांचे सुख-दुःख, अडचणी, विकास आणि भविष्य यासाठी उदय सामंत सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.” मिरकरवाडा बंदर हे केवळ बंदर न राहता महाराष्ट्रातील एक आदर्श मासेमारी केंद्र बनावे, अशी आपली सामूहिक इच्छा असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी मंत्री नितेश राणे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच असंख्य मच्छीमार बांधव उपस्थित होते.