रत्नागिरी: रत्नागिरीच्या मातीत घडणाऱ्या आणि भविष्यात देशाचे नेतृत्व करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांनी आज उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी जिजाऊ संस्थेच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याबद्दल निलेशजी आणि त्यांच्या टीमचे मनापासून अभिनंदन केले.
आपल्या भाषणात मंत्री सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, साने गुरुजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा समृद्ध वारसा लाभल्याचे नमूद केले. “शिक्षण हे केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून, ती विचारांची तलवार आहे – जी योग्य धार दिल्यास समाजात क्रांती घडवू शकते,” असे ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘महामानव’ हे पुस्तक दाखवत त्यांनी संघर्ष समजून घेण्यासाठी बाबासाहेबांचा प्रवास वाचणे कसे आवश्यक आहे, यावर भर दिला.
सामंत यांनी अभिमानाने सांगितले की, आज रत्नागिरी जिल्ह्यातून NASA मध्ये जाणारे विद्यार्थी तयार होत आहेत. याचे कारण येथे शिक्षणाची भूक आहे आणि ती भागवण्यासाठी सरकार, पालक, शिक्षक आणि संस्था एकत्र येत आहेत. मुलांच्या हातात मोबाईल असला तरी, त्याचा किती वेळ शिक्षणासाठी वापर होतो हे ठरवणे आपल्यावर अवलंबून असल्याचे त्यांनी पालकांना सांगितले.
अमली पदार्थ आणि वाईट संगतीपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी पालक, शिक्षक आणि शासनाने एकत्र पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पालकमंत्री म्हणून यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सामंत यांनी सांगितले.
शासकीय मेडिकल कॉलेजमुळे आता शेतकऱ्याच्या मुलालाही डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकार करता येईल, असे सांगून, ही आपली जबाबदारी होती आणि ती आपण पूर्ण केल्याचे त्यांनी नमूद केले. “शिक्षण ही तलवार आहे, आणि तिची धार आपल्याच हातात आहे. रत्नागिरीच्या मातीतून उद्या एक टिळक, एक बाबासाहेब नक्कीच घडेल – फक्त गरज आहे मेहनतीची, संघर्षाची आणि योग्य मार्गदर्शनाची,” असे उद्गार यावेळी मा. ना. उदयजी सामंत यांनी काढले.
याप्रसंगी शिवसेना पक्षाचे उपनेते, जिजाऊ संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष निलेशजी सांभरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो विद्यार्थी मित्र उपस्थित होते.














