दापोली : लाडघर समुद्रकिनारी आढळला दुर्मीळ रेचन मासा

दापोली : लाडघर समुद्रकिनारी बिबट्यासारख्या रंगाचा दुर्मीळ रेचन मासा शनिवारी सापडला आहे. रविराज हेकर यांना हा मासा समुद्र किनारी खडकाळ भागात आढळून आला.

बिबट्यासारखे चट्टे असलेल्या या माशाला स्थानिक पातळीवर वाघोळ, वाघमासा, गवारे, गवाळ किंवा गवळा अशा विविध नावाने ओळखले जाते. याची देह रचना लांबट व अजगरासारखी असते, तर राहण्याचे ठिकाण हे समुद्रातील उथळ व खडकाळ भाग असते. हा मासा लहान मासे व कोळंबी यांना भक्षण करतो. खवय्यांमध्ये याला चांगली मागणी असून विशेषतः हॉटेल्समध्ये याचा वापर केला जातो. शिवाय आकर्षक रंगसंगतीमुळे तो फिशटॅन्क मध्ये सजावटीसाठीही ठेवला जातो. त्यामुळे बाजारात चांगली किंमत मिळते. मात्र दापोली लाडघर येथील रविराज यांनी हा मासा पुन्हा सुरक्षितपणे समुद्रात सोडला.

या माशाला लेस्ड मोराय ईल (शास्त्रीय नावः जिमनोथोरॅक्स फॅव्हेंजिनियस) किंवा याला लेपर्ड मोराय, लेपर्ड मोराय ईल, टेसेलेट मोराय किंवा हनीकॉम्ब मोराय असेही म्हणतात. ही मुरेनिडे कुटुंबातील सागरी माशांची एक प्रजाती आहे. त्यांची लांबी ६ फुटांपर्यंत वाढू शकते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 28/Jul/2025