रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील भक्तिपरंपरेला उजाळा देणारा आणि वारकरी भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेला पायी दिंडी सोहळा पहिल्या श्रावण सोमवारी २८ जुलै रोजी होत आहे.
या सोहळ्याचे आयोजन मुरादपूर येथील श्रीमत् भागवत नाम संप्रदाय मंडळ आणि संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदायाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
या दिंडीचे प्रस्थान मुरादपूरच्या श्री राधाकृष्ण मंदिरातून श्रावण शुद्ध चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर सोमवारी होणार असून कोकणातील श्रद्धास्थान श्री क्षेत्र मार्लेश्वरापर्यंत दिंडी निघेल. दिंडीची सुरुवात सकाळी श्रींच्या नामस्मरणाने व टाळमृदंगाच्या गजरात होणार आहे. महिला-पुरुष, लहानथोर सर्व भाविकांनी या दिंडीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हभप वैकुंठवासी तुकाराम महाराज काजवे यांनी या पायी तीर्थयात्रेची प्रेरणा त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनातून दिली. दिंडीच्या प्रमुख समितीत अध्यक्ष हभप संजय महाराज कानाल (चिखली), खजिनदार हभप सुनील महाराज करंडे गुरुजी (माळवाशी), हभप रमेश महाराज बांडागळे (मुरादपूर), हभप नंदकुमार महाराज लिंगायत (तुरळ) हे सेवाभावी सदस्य कार्यरत आहेत.
पायी तीर्थयात्रा घडो । देह संताघरी पडो ।। या संतवाणीप्रमाणे जीवनात भक्तिमार्ग साकार करण्याचा हा एक सुंदर प्रसंग असून, संगमेश्वर तालुक्यातील सर्व आबालवृद्ध, वारकरी बंधूभगिनींनी या पावन दिंडीत सामील व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 28-07-2025














