रत्नागिरी जिल्ह्यात 263 ठिकाणी माकडांचे वास्तव्य

रत्नागिरी : जिल्ह्यात २६३ ठिकाणी माकडांचे वास्तव्य असल्याचे सर्व्हेक्षणात आढळले आहे.

गेले वर्षभर वाडीवस्तीसह जंगलभागात वनविभागाकडून ही मोहीम राबवण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यात चार हजाराहून अधिक माकडे असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्या माकडांना पकडण्यासाठी लवकरच मोहीम हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी हिमाचल प्रदेशमधील तज्ज्ञांचे पथक येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

कोकणाचे अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे. बागायती शेतीतून मिळणाऱ्या उत्पनांवर शेतकरी कुटुंबांची गुजराण होते; मात्र माकडांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी माकडांना पकडण्याची मोहीम रत्नागिरी जिल्हाभरात हाती घेण्यात येणार आहे. प्राण्यांपासून शेती वाचवण्यासाठी भारतीय किसान महासंघ, कोकण भूमी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला होता. भयमुक्त शेतीसाठी वानर, माकडांचा बंदोबस्त करा अन्यथा गोळ्या घालण्याची परवानगी द्या, अशी मागणी करत हजारो शेतकरी दापोली वनविभागाच्या कार्यालयावर धडकले होते. या वेळी विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांना निवेदन देण्यात आले होते. या वेळी त्यांनी लवकरच जिल्ह्यात माकडे पकडण्याची मोहीम राबवली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात माकडांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, माकडांना पकडण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात चार हजार माकडांची नोंद करण्यात आली असून, त्यांना पकडण्याची मोहीम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

नैसर्गिक अधिवासात सोडणार

शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन सरकारने वानर, माकडांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली. या समितीने सरकारकडे अहवाल सादर केला. त्यानंतर वानर, माकडांचा बंदोबस्त करण्याच्या हालचालींना वेग आला. वनविभागाच्या माध्यमातून माकडांना पकडण्यात येणार असून त्यांना सह्याद्रीच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:23 17-10-2024