संगमेश्वर : मानसकोंड येथे मुसळधार पावसाने कोसळली संरक्षक भिंत

संगमेश्वर : गेले दोन दिवस वादळी वाऱ्यांसह कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने मानसकोंड येथे घराची संरक्षक भिंत कोसळून मोठे नुकसान झाले. शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यामुळे घराला धोका निर्माण झाला आहे.

रवींद्र रोंगा फेपडे (वय ४८, फेपडेवाडी) यांनी वर्षभरापूर्वीच नवीन घर बांधले होते. यांच्या घराच्या बाजूला एक संरक्षक भिंत आहे. ही संरक्षक भिंत शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसात कोसळली. ही भिंत घराच्या भिंतीवर धडकल्याने एका भिंतीचे चिरे कोसळून मोठे भागदाड पडले आहे. भिंत कोसळताच झालेल्या मोठ्या आवाजाने रवींद्र फेपडे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह घराच्या बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.

भिंत कोसळताच झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली. घरातील साहित्य बाजूला करण्यात आले. सरपंच सुहास मायगडे, पोलिसपाटील सुनील शिगवण यांनी कुटुंबाला सुरक्षितस्थळी हलविले. सध्या या घराला धोका निर्माण झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 28/Jul/2025