रत्नागिरी : मारुती आळीतील दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरात हरिनाम गजर

रत्नागिरी : शहरातील मारुती आळी येथील सुप्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे श्रावण मासातील पहिल्या शनिवारी एकदिवसीय हरिनाम गजर एक्का करण्यात आला. या एक्क्यात सादर झालेल्या भजनांमध्ये भाविक तल्लीन झाले.

पहाटे ५ वाजता लघुरूद्र आणि पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत नामगजर एक्का, विविध भजने व आरती करण्यात आली. सकाळी श्री हनुमान भजन मंडळाने सुश्राव्य भजन सादर केले. या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रमोद शेरे व भक्तगण उपस्थित होते. श्रावण मासातील पहिल्या शनिवारी दर्शनासाठी गर्दी झाली. मंदिराचे ज्येष्ठ पुजारी हेमंत पटवर्धन यांनी पूजाअर्चा केली.

श्रावणानिमित्त २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:३० ते ६:३० वाजता भजन श्री व्याडेश्वर मित्र भजन मंडळ रत्नागिरी बुवा राजेंद्र सावंत, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता श्री अनिरुद्ध उपासना केंद्र, शाखा रत्नागिरी शहर यांचा सत्संग, राखणा शनिवार त्या दिवशी राखणेचे नारळ घेतले जातील. सायं. ४:३० ते ६:३० वाजता श्री समर्थ प्रासादिक भजन मंडळ काजरघाटी बुवा प्रसाद शिंदे यांचे भजन होईल. रात्री १० ते १२ वाजता श्री भैरव प्रासादिक भजन मंडळ मुरूगवाडा (कै. शंकरराव मयेकर) बुवा अजय पिलणकर यांचे भजन व नंतर आरती, सामुदायिक गाऱ्हाणे, १६ ऑगस्ट रोजी ४:३० ते ६:३० वाजता भजन, २३ ऑगस्ट रोजी रात्री ८ ते ९:३० वाजता श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी भजन मंडळ, काजरघाटी यांचे भजन होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 28/Jul/2025