दोन्ही वीजमीटरची माहिती ग्राहकांना द्या : आमदार शेखर निकम

चिपळूण : स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर नेहमीपेक्षा जास्त वीजबिल येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. त्यासाठी जुने वीजमीटर आणि स्मार्ट वीजमीटर या दोन्हींची प्रात्यक्षिके ग्राहकांना दाखवा, अशी सूचना आमदार शेखर निकम यांनी महावितरण अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार जिल्ह्यातील चारही महावितरणच्या विभागीय कार्यालयात प्रत्येकी दोन प्रात्यक्षिके घेतले जातील, असे महावितरणचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी सांगितले.

चिपळूण तालुक्यातील नागरिकांना विश्वासात न घेताच गावोगावी स्मार्ट वीजमीटर बसवले जात आहे. नवीन मीटरनंतर वीजबिलात वाढ होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सरपंच संघटनेने साखळी उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आमदार निकम यांनी महावितरणचे मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंता सुनील माने, कार्यकारी अभियंता नितीन पळसुलेदेसाई, संतोषकुमार कॅरमकोंडा, उपकार्यकारी अभियंता अनिल खोडे, शाखा अभियंता प्रवीण राऊत, मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक अशोक काजरोळकर आदींच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्यामध्ये नागरिकांनी स्मार्ट वीजमीटरच्या समस्या मांडल्या. सध्या ग्राहकांना विश्वासात न घेताच स्मार्ट वीजमीटर बसवले जातात. परिणामी, नेहमीपेक्षा वीजबिले वाढली आहेत. त्यासाठी
ग्राहकांच्या संमतीशिवाय नवीन मीटर बसवू नयेत.

नियमित मीटर वाचन करून ग्राहकांना त्याची माहिती द्यावी तसेच वीजबिले पुन्हा तपासून ग्राहकांशी प्रत्यक्ष संपर्क करून सुधारित करावीत, अशा सूचना आमदार निकम यांनी दिल्या आहेत. वीजमीटर बसवण्यासाठी नेमलेल्या खासगी कंपन्यांना थांबवा, असेही आमदार निकम यांनी सांगितले. ग्राहकांचे म्हणणे रास्त असून, स्मार्ट वीजमीटरचा संभ्रम दूर करा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

मीटरमध्ये गडबड नाही
जिल्ह्यात महावितरणची चार विभागीय कार्यालये आहेत. तेथे जुने व नवीन मीटर बसवून प्रात्यक्षिके घेतले जातील. नवीन मीटर बसवल्यानंतर वीजबिल वाढल्याची तक्रार आल्यास तिथेही प्रात्यक्षिक घेतले जाईल. राज्य सरकारनेच स्मार्ट वीजमीटर बसवण्याचा निर्णय घेतला असून, त्यात कोणतीही गडबड नाही, असे मुख्य अभियंता डोये यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 28/Jul/2025